जलस्तर घटला : नागरिकांची पाण्यासाठी भटकंतीचंद्रपूर: जून महिना उलटूनही पाऊस न आल्याने जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांचा पाण्यासाठी संघर्ष सुरू झाला आहे. जमिनीतील पाण्याची पातळी खालावल्याने गावातील विहिरी, हातपंप आटले असून नदी नालेही आटण्याच्या स्थितीत आहेत. त्यातच जीवती तालुक्यातील पहाडावर असलेल्या अनेक गावांत टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. जिल्ह्यातील जलाशयांमधील पाणी वेगाने आटत चालले आहे. आभाळात ढग दाटून येतात पण पाऊसच येत नाही. अशी स्थिती आहे. चंद्रपुरात होणाऱ्या वीज उत्पादनासह उद्योगांवरही जलसंकट ओढवण्याची चिन्हे आहेत. अत्यल्प पावसामुळे जिल्ह्यात आतापर्यंत केवळ १४ टक्के पेरण्या झाल्या आहेत. धानपट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मूल, सावली, सिंदेवाही, नागभीड, ब्रह्मपुरी या तालुक्यांमध्ये अद्यापही धान रोवणीला सुरूवात झाली नाही. पावसाअभावी जिल्ह्यातील ४ लाख ६९ हजार हेक्टरपैकी केवळ ५७ हजार ७४६ हेक्टरवर पेरणी झाली आहे. मागील वर्षी जूनच्या अखेरपर्यंत १०० टक्के पेरण्या आटोपल्या होता. मात्र यावर्षी आतापर्यंत केवळ १४ टक्के पेरण्या झाल्या आहेत. मान्सूनचे आगमन न झाल्याने जिल्ह्यातील लहानमोठी जलायशेही आटत चालली आहेत. चंद्रपूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या इरई धरणासह आसोलामेंढा व नलेश्वर ही धरणे सोडली तर उर्वरित सर्व जलाशये वेगाने आटत आहेत. चंदई धरणे पूर्णत: रिते झाले आहे. लभानसराड प्रकल्पात केवळ ०.०४ टक्के जलसाठा आहे. इरई धरणात सर्वांत जास्त म्हणजे ४५.१३ टक्के जलसाठा शिल्लक आहे. विशेष म्हणजे मागील वर्षी जुलै महिन्यात जिल्ह्यातील सर्व धरणे तुडूंब भरली होती. यावर्षी मात्र स्थिती भयावह आहे. पावसाअभावी अनेक शेतकऱ्यांंना आर्थिक फटका सहन करीत आता दुबार पेरणी करावी लागणार आहे. (प्रतिनिधी)
पहाडावर टँकरने पाणी पुरवठा
By admin | Updated: July 6, 2014 23:51 IST