राजुरा : राजुरा तालुक्यातील आसिफाबादकडून येणाऱ्या सिमेंट टँकरचालकाचे नियंत्रण सुटल्याने तेलंगणा- महाराष्ट्र सीमेवरील महामार्गातील लक्कडकोट येथील वनविभागाच्या तपासणी नाक्याला जबर धडक दिली. यात इमारत व साहित्याची नासधूस झाली. येथे कार्यरत वनपाल व वनमजूर सुदैवाने थोडक्यात बचावले. ही घटना गुरुवारी घडली.
घटनेची माहिती मिळताच लक्कडकोट येथील ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले. विशेष म्हणजे, याच ठिकाणी राजुरा पोलीससुद्धा दारूबंदी तस्करीसाठी तैनात असतात. तेलंगणा-महाराष्ट्र राज्य सीमा असल्याने येथे वनविभागाचा वनउपज तपासणी नाका आहे. वनउपज नोंदणीकरिता वाहने येथे थांबविली जातात. परंतु, महामार्ग असल्याने इतर वाहनाचीही वर्दळ असते. अशातच तेलंगणाकडून सिमेंट भरलेले टँकरचालकाचे नियंत्रण सुटल्याने चक्क तपासणी नाक्यालाच टँकरची धडक बसली. सुदैवाने मनुष्यहानी झाली नसली तरी तपासणी नाक्याची इमारत व साहित्याची नासधूस झाली. यात वनपाल चक्रधर भोयर आणि वनमजूर लक्ष्मण लाडसे हे थोडक्यात बचावले.