भद्रावती : केंद्र शासनाने बंद केलेल्या येथील इंटिग्रेटेड बरांज ओपनकास्ट कोळसा खाणीला सुरुवात करुन त्या ठिकाणच्या कामगारांना त्यांचे थकीत वेतन द्यावे, यासाठी वेळोवेळी पत्रव्यवहार केला. मात्र यावर काहीच निर्णय न घेतल्याने अखेर २ सप्टेंबरला दुपारी १२ वाजता मजदूर काँग्रेसचे अध्यक्ष एस. क्यू. जामा यांच्या नेतृत्वात डॉ. आंबेडकर पुतळ्याचे समोर धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.धरणे आंदोलनानंतर दुपारी १.३० वाजता जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्या कार्यालयावर मोर्चा नेण्यात येणार आहे. यावेळी चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमेटीचे उपाध्यक्ष के. के. सिंह, भद्रावती शहर काँग्रेसचे अध्यक्ष दिलीप ठेंगे, वेकोलि माजरी क्षेत्राचे इंटक अध्यक्ष आर. के. रॉय, धनंजय गुंडावार यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित राहतील. केंद्रीय कोळसामंत्री पियुष गोयल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ना. हंसराज अहीर यांच्याशी चर्चा करुन आणि वेळोवेळी पत्रव्यवहार करुन काहीच प्रगती झाली नाही. खाण बंद असल्याने गेल्या १५ महिन्यांपासून कार्यरत कामगारांना वेतन देणे बंद केल्याने त्यांची आर्थिक स्थिती हलाखीची झाली आहे. यासंदर्भात सहाय्यक श्रम आयुक्त (केंद्रीय) चंद्रपूरद्वारा ९ आॅगस्टला २०१६ ला कर्नाटक एम्टा कोळसा खाणीच्या प्रबंध निदेशक यांना पत्र पाठवून यावर १० दिवसात लेखी स्पष्टीकरण मागितले. याव्यतिरिक्त कोणताच व्यवहार या संदर्भात शासनाने केला नाही. २ सप्टेंबरला शुक्रवारला या मागण्यासंदर्भात एस. क्यु. जामा यांच्या नेतृत्वात धरणे तसेच जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती महेश पेटकर यांनी दिली आहे. (शहर प्रतिनिधी)
कर्नाटका एम्टा कोळसा खाणीसाठी आज धरणे
By admin | Updated: September 2, 2016 00:51 IST