चंद्रपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रभाग क्रमांक १७ येथे गरीब व कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या प्रभागात रोड, नाली, वीज अशा विविध समस्या आहेत. पावसाळ्यात या प्रभागातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात समस्यांना सामोर जावे लागते. मागील काही दिवसांपूर्वी शहरात आलेल्या पावसाने नागरिकांच्या घरात पाणी शिरले. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी रस्ता बनविण्याची मागणी नगरसेवक अनिल रामटेके यांच्याकडे केली. त्यांनी परिसरातील नागरिकांचे निवेदन तयार करून शहर अभियंता महेश बारई यांच्याकडे दिली. मात्र त्यावर कारवाई करण्याचे सोडून शहर अभियंता बारई यांनी ती फाईल अक्षरशा फेकून दिली. ते मनपा कार्यालयातसुद्धा नेहमीच उर्मट वागणूक करीत असतात, असा आरोप बहुजन समाज पार्टीच्या शिष्टमंडळांनी केला असून बारई यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी मनपा आयुक्तांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. निवेदन देताना बहुजन समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष मुक्कदर मेश्राम, मनपा गटनेता अनिल रामटेके, जिल्हा संयोजिका मनीषा नैताम, शहर अध्यक्ष शिरिश गोगुलवार, प्रशांत रामटेके, शहर सहसचिव सागर वरघणे, राहुल कामटे, विवेक दुपारे आदी उपस्थित होते.
‘त्या’ अभियंत्यावर कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:19 IST