यात्रा स्थळांना सुविधेचा अभाव
चंद्रपूर : जिल्ह्यात चिमूर, कोरपना, राजुरा, सिंदेवाही आदी तालुक्यांमध्ये काही ठिकाणी यात्रा भरते. मात्र येथे सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. जिल्ह्यातील प्रत्येक यात्रा स्थळांचा विकास करावा, अशी मागणी होत आहे.
विजेच्या लपंडावाने नागरिक त्रस्त
जिवती: परिसरातील अनेक गावांमध्ये विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत आहे. त्यामुळे नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. वीज वितरण कंपनीने याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली.
गावफलक लावण्याची मागणी
चंद्रपूर : जिल्ह्यातून अनेक राज्य महामार्ग, तालुका मार्ग, ग्रामीण मार्ग गेले आहेत. मात्र यातील बहुतांश रस्त्यावर गावाच्या नावाचा फलक नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत असते. या मार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देऊन समस्या मार्गी लावावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे.
गंजवार्ड परिसरातील रस्त्यावर दुर्गंधी
चंद्रपूर :येथील गंजवार्ड परिसरातील रामाळा तलावाशेजारी असलेल्या चौकामध्ये कचरा टाकत असल्याने रस्त्यावर दुर्गंधी पसरली आहे. दुर्गंधीमुळे नागरिकांसह वाहनधारकांना त्रास सहन करावा लागणार आहे. महानगरपालिकेने याकडे विशेष लक्ष देऊन नियमित कचरा साफ करावा, अशी मागणी केली जात आहे.