न्यायालयाचा दणका : निवडणूक होणार की, नगरपरिषद बाद होणार? चिखलपरसोडी : ११ एप्रिल २०१६ ला नागभीड ग्रामपंचायतीला नगर परिषद म्हणून घोषित करण्यात आले. त्यामध्ये १२ गावांचा समावेश करण्यात आला व त्यानुसार समोरील प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्याअनुसंघाने निवडणूक प्रक्रिया पण सुरू झाली. परंतु, उच्च न्यायालयाने स्थगिती नोटीस बजावल्याने निवडणूक होणार की, नगरपरिषद बाद होणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.नागभीड, नवखडा, डोंगरगाव (बु.), चिंचोली खुर्द, ब्राम्हणी, बोथली, चिखलपरसोडी, भिकेश्वर, सुलेझरी, खैरीचक, तुकूम, तिवर्ला, गावगन्ना ही महसुली गावे मिळून नागभीड नगरपरिषद गठीत केली. यातील नऊ गावांनी विरोध दर्शवित नगरपरिषदेच्या विरोधात बाम्हणी येथील सरपंच जयश्री नारनवरे यांनी याचिका दाखल केली. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असून त्या अनुसंघाने नगरविकास विभाग सचिव, चंद्रपूर जिल्हाधिकारी, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी व नागभीडचे तहसीलदार यांना उच्च न्यायालाने दोन आठवड्यात अहवाल सादर करण्याकरिता निर्देश दिले होते. परंतु अहवाल सादर न केल्याची माहिती आहे.या नगरपरिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून त्यानुसार आठ प्रवर्ग सुद्धा पाडण्याची प्रक्रिया झाली. समोरील प्रक्रिया सुरू असताना उच्च न्यायालयाने नगरपरिषद निर्मितीबाबत मागितलेला अहवाल प्राप्त न झाल्याने २४ आॅगस्टला नगरपरिषद निवडणुकीला स्थगिती दिली आहे. त्यामुळे सध्यातरी निवडणुकीसाठी सज्ज झालेल्या उमेदवारांची हिरमोड झाली असून या नगरपरिषदेकडे तालुक्याचे लक्ष लागून आहे. (वार्ताहर)
नागभीड नगरपरिषद निवडणुकीला स्थगिती
By admin | Updated: September 1, 2016 01:24 IST