लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : एका प्रेमीयुगुलाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना मंगळवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास चंद्रपूर तालुक्यातील बोर्डा येथे उघडकीस आली. अजय प्रकाश मंगाम (२६) रा. सादागड ता. सावली, पूजा मुर्लीधर टेकाम (२४) रा. बोर्डा ता. चंद्रपूर असे आत्महत्या करणाऱ्या प्रेमीयुगुलाचे नाव आहे.येत्या ५ जून रोजी पूजाचे लग्न ठरले होते. अजय हा उर्जानगर येथील एका खासगी कंपनीमध्ये काम करीत होता. पूजाच्या घराशेजारी अजयचा मामा अनिल कुंभरे हा वास्तव्यास आहे. अजयचे आपल्या मामाच्या घरी नेहमी जाणे-येणे होते. अशातच त्याची पूजाशी ओळख झाली. नंतर भेटीगाठी वाढल्या. कालांतराने या भेटीचे रुपांतर प्रेमात झाले. पूजाला भेटण्यासाठी अजयचे मामाच्या निमित्ताने बोर्डा येथे ये-जा वाढले. दोघेही एकमेकांना भेटून भावी आयुष्याची स्वप्ने रंगवत होती. त्यांनी प्रेमात आणाभाकाही घेतल्याचे समजते. या प्रेमाची चुणुक घरच्या मंडळींना लागली. मात्र त्यांना या दोघांच्या प्रेमाला विरोध होता. भविष्यात आपण एकत्र येऊ, ही आशा धुसर होऊ लागली. अशातच पूजाच्या वडिलाने तिच्यासाठी स्थळ शोधून तिचे लग्न ठरविले. ५ जून अशी लग्नाची तारीख निश्चित झाली होती. ही तारीख जसजशी जवळ येत होती. तसतशी या प्रेमीयुगुलाची अस्वस्थता वाढत होती. मात्र त्यांचे चोरून भेटणे सुरूच होते. अशातच १६ मेपासून ते दोघेही अचानक बेपत्ता झाले. घरच्या मंडळींनी दोघांचाही सर्वत्र शोध घेतला. मात्र त्याचा काहीएक उपयोग झाला नाही. अशातच आज सकाळी बोर्डा येथीलच एका विहिरीत या प्रेमीयुगालाचे मृतदेह तरंगताना आढळले. ही वार्ता पंचक्रोशीत पोहचताच अनेकांनी घटनास्थळाकडे धाव घेऊन हळहळ व्यक्त केली. घटनेची माहिती होताच चिचपल्ली पोलीस चौकीचे राजू मडावी व रामनगर पोलीस स्टेशनचे कर्मचारीसुद्धा घटनास्थळवर पोहचले. गावकऱ्यांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे हलविले. दोघांचेही मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होते. यावरून १६ मे रोजीच त्यांनी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली असावी, असा संशय आहे. अधिक तपास रामनगर पोलीस करीत आहेत.
चंद्रपूर तालुक्यात प्रेमीयुगुलाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 15:34 IST
एका प्रेमीयुगुलाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना मंगळवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास चंद्रपूर तालुक्यातील बोर्डा येथे उघडकीस आली.
चंद्रपूर तालुक्यात प्रेमीयुगुलाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
ठळक मुद्देबोर्डा येथील घटनाप्रेयसीचा ५ जूनला होता विवाह