चंद्रपूर : शहरातील सुगतनगर परिसरातील रस्ते व नाल्यांची दुरवस्था झाली आहे. परिसरातील नागरिक दुरुस्ती करण्याची मागणी मागील अनेक वर्षांपासून करीत आहेत. मात्र, संबंधित विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे सुगतनगर येथील रस्ते व नाल्याची समस्या न सोडविल्यास वंचित बहुजन महिला आघाडीतर्फे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा वंचित बहुजन आघाडीच्या शहराध्यक्ष तनुजा रायपुरे यांनी मनपा आयुक्तांना दिलेल्या निवेदनातून केला आहे. सुगतनगर हा परिसर शहरातील मध्यभागात वसला आहे. मात्र, या परिसरात अद्यापही मूलभूत समस्यांची वानवा आहे. येथील रस्ते व नाल्यांची दुरवस्था झाली आहे. शहरात पूर्वीच डेंग्यू, टायफाइडने डोके वर काढले आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या परिसरात पथदिवे नसल्याने शहरात अंधाराचे साम्राज्य पसरले असते. याकडे अनेकदा संबंधित विभागाचे लक्ष वेधण्यात आले. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने आयुक्तांना निवेदन देऊन समस्या सोडविण्याची मागणी केली; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा निवेदनातून देण्यात आला. निवेदन देताना बहुजन आघाडीच्या शहराध्यक्ष तनुजा रायपुरे, जिल्हा सल्लागार लता साव, शहर महासचिव मोनाली पाटील, उपाध्यक्ष सुलभा चांदेकर, कार्यकारी सदस्य इंदूताई डोंगरे, दमयंती तेलंग, अनिता जोगे, विद्या टेंभरे, रेखा उमरे, पुष्पा ठमके आदींची उपस्थिती होती.
रस्ते आणि नाल्यांच्या दुरवस्थेने सुगतनगरवासीय त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:20 IST