घुग्घूसमध्ये गारपीट : चंद्रपूरसह अनेक ठिकाणी वादळी पाऊस चंद्रपूर : जिल्ह्यात सतत अवकाळी पाऊस सुरू असून मंगळवारी पुन्हा अवकाळी पावसाने हजेरी लावली. घुग्घूस येथे सुमारे एक ते दीड तास पाऊस व गारपीट झाली. त्यामुळे एसीसी मार्गावरील झाडे उन्मळून पडली. वीज खांबावर झाडे कोसळल्याने घुग्घूस व नकोडा गावाचा वीज पुरवठा बंद पडला. मंगळवारी जिल्ह्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. त्यामुळे अनेक अनेक गावातील बत्ती गूल झाली. चंद्रपुरातही वादळ सुटले होते. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात अवकाळी पाऊस सुरू असून मार्च महिन्याच्या सुरूवातीलाच जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे रबी पीक भिजले होते. त्यानंतर परत दोन दिवसानी मुसळधार पाऊस झाला होता. यात अनेकांच्या घरांचे छप्परे उडाली तर काही ठिकाणी रस्त्यावर झाले कोसळली होती. १५ ते २० दिवसांच्या विश्रांतीनंतर मार्च एडिंगलाही पावसाने पुन्हा पावसाने हजेरी लावली होती. या वादळी पावसाचा फटका जिल्हा पोलीस दलातर्फे आयोजित संगीत रजनी कार्यक्रमालाही बसला होता. मात्र आता कडक ऊन्ह तापणे सुरू झाले असून पाऊस येणार नाही, अशी आशा होती. मात्र मंगळवारी पुन्हा पावसाने हजेरी लावली. सायंकाळी चंद्रपूर, नागभीड, वरोरा, चिखलपरसोडी, भिसी, आवाळपूर, शंकरपूर, ब्रह्मपुरी, विरूर, जीवती, गडचांदूर, गोंडपिंरी आदी ठिकाणी पाऊस झाला. वीज खांबावर झाडे कोसळल्याने वीज पुरवठा बंद पडला. (स्थानिक प्रतिनिधी)वीज पडून दोन बैल ठारवरोरा : शहरालगतच्या शेंबळ येथे वीज पडून दोन बैल ठार झाल्याची घटना सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली. कुंदन खापने यांनी आपले दोन बैल घरासमोरील झाडाला बांधून ठेवले होते. अचानक झालेल्या पावसाने झाडावर वीज कोसळली. त्यामुळे दोन्ही बैलांचा मृत्यू झाला. त्यामुळे शेतकऱ्याचे चार लाखाचे नुकसान झाले आहे. तणसाचे ढीग जळालेबाळापूर : येथून दोन किमी अंतरावर असलेल्या देवपायली येथील मुर्लीधर उमले या शेतकऱ्याच्या तणसाच्या ढिगावर वीज कोसळली. यात तणासाचा ढीग जळून खाक झाला. ही घटना मंगळवारी दुपारी ४ वाजता घडली. गावकऱ्यांनी घटनास्थळावर धाव घेऊन आग विझवली.
अवकाळी पावसाचा झटका
By admin | Updated: April 6, 2016 00:40 IST