वरोरा: विशेष घटक योजनेत लाभार्थ्यांची निवड करुन त्यांना शेतात विहीरी तयार करण्यासाठी बाध्य केले. विहिरीचे काम तीन महिन्यापूर्वीच पूर्ण झाले आहे. मात्र काम पूर्ण होवूनही लाभार्थ्यांना अनुदान मिळाले नसल्याने लाभार्थी आर्थिक संकटात सापडले आहे.महाराष्ट्र शासनाच्या निकषाप्रमाणे विशेष घटक योजनेमध्ये अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीमध्ये मोडत असलेल्या शेतकऱ्यांची लाभार्थी म्हणून निवड केली जाते. यामध्ये लाभार्थ्यांना शेती असणे गरजेचे आहे. लाभार्थ्यांची निवड झाल्यानंतर सर्व सोपस्कार पूर्ण करीत कागदपत्रांची जुळवाजुळव करून ती कार्यालयाला सादर केल्यानंतर अधिकारी शेताची पहाणी करुन लाभार्थ्यांना विहीरीचे काम करावयास सांगितले. लाभार्थ्यांनी आप्तेष्टांकडून उसणवारीने पैसे घेऊन प्रसंगी उधारीवर साहित्य मागावून विहिरीचे काम पूर्ण केले. त्या कामाची पहाणी अहवाल संबंधीत विभागाच्या अधिकाऱ्यांनी सुपूर्द केला. परंतु मागील तीन महिन्यापासून आजतागायत लाभार्थ्यांना अनुदान मिळाले नाही. लाभार्थी दररोज पंचायत समितीच्या येरझरा करीत आहेत. परंतु त्यांना अद्यापपर्यंत अनुदान मिळाले नाही. ते केव्हा मिळणार, याबाबत कुणीही मार्गदर्शन करीत नसल्याने लाभार्थी आर्थिक संकटात सापडले आहे. या योजनेतील पदभार कुणाकडेच नाही. विशेष घटक योजनेला पदभार असलेले अधिकारी मागील तीन महिन्यापूर्वीच स्थालांतरित झाले. त्यांचा इतर पदभार कार्यरत अधिकाऱ्यांना देण्यात आला. परंतु विशेष घटक योजनेचा कार्यभार कुणाकडेही देण्यात आला नाही. लाभार्थ्यांनी जेव्हा पंचायत समितीच्या अधिकाऱ्याची भेट घेतली तेव्हा ही बाब उघडकीस आली. त्यामुळे तात्काळ एका विस्तार अधिकाऱ्याकडे विशेष घटक योजनेचा पदभार देवून सारवासारव केल्याचे दिसून येते. (तालुका प्रतिनिधी)
विशेष घटक योजनेतील लाभार्थ्यांचे अनुदान रेंगाळले
By admin | Updated: May 13, 2015 00:08 IST