ब्रह्मपुरी : उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे यांनी मंगळवारी सकाळी शहरातील लेंडारी तलावाला भेट दिली. मासोळ्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचा आढावा घेतला. नगर परिषद मुख्याधिकारी मंगेश वासेकर यांच्याशी चर्चा करून तलावाचे सफाई अभियान तीव्र गतीने राबविण्याच्या सूचनाही यावेळी क्रांती डोंबे यांनी आरोग्य विभाग, सफाई कर्मचारी व ढिवर समाजबांधवांना दिल्या. त्यासाठी तत्काळ आवश्यक ती साधनसामग्री उपलब्ध करून दिली जाईल. तलाव शक्य तेवढ्या लवकर दुर्गंधीमुक्त करण्यासाठी सहकार्य करण्याचेही आवाहन त्यांनी केले.
ब्रह्मपुरी नगर परिषदेकडे असलेल्या बोटीचा आधार घेऊन शहरातील ढिवर समाजबांधवांच्या मदतीने तलावातील मृत मासे आणि जलपर्णी तत्काळ बाहेर काढून तलावाची स्वच्छता करण्यात येणार आहे. शहरातील पेठवार्ड, धुमनखेडा, जाणीवार्ड परिसराला लागून लेंडारी तलाव आहे. या तलावातून दुर्गंधी येत आहे. यावेळी उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे यांच्यासह नगर परिषदेचे मुख्याधिकारी मंगेश वासेकर, आरोग्य निरीक्षक ठोंबरे उपस्थित होते.
तलावाच्या देखभाल-दुरुस्तीकडे दुर्लक्ष
तलावाचा मालकी हक्क नियमाप्रमाणे नगर परिषद वा पंचायत समिती यापैकी कुणाकडेही नाही. त्यामुळे या तलावाच्या देखभाल व स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाले आहे. या तलावाचे ब्रह्मपुरी नगर परिषदेकडे हस्तांतरण करणे आवश्यक आहे. शहरातील ढिवर समाज या तलावात बीज टाकून मोठ्या प्रमाणात मासेमारी करतात. या तलावाची देखभाल कोणत्याही शासकीय यंत्रणेकडे नाही.