पोलीस अधीक्षकांकडे तक्रार : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा पुढाकारचंद्रपूर: येथील सरदार पटेल महाविद्यालयात शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थींची छेड काढणाऱ्या गुंडावर कठोर कारवाई करण्याची मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने जिल्हा पोलीस अधिक्षकांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.सरदार पटेल महाविद्यालय परिसरात अनेक पानठेले व चहाच्या टपऱ्या आहेत. या टपऱ्यांवर शहरातील काही गुंड प्रवृत्तीच्या युवकांचे टोळके कायम बसून असते. टोळक्याकडून या महाविद्यालयात ये-जा करणाऱ्या विद्यार्थींनीची छेड काढण्याचे प्रकार वाढले असल्याने विद्यार्थिंनीमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. यासंदर्भात काही विद्यार्थिनींनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडे तक्रारी केल्या. त्याची दखल घेत अभाविपचे सहमंत्री रघुवीर अहीर यांनी यासंदर्भात जिल्हा पोलीस अधिक्षकांना निवेदन देऊन कारवाईची मागणी केली. शहरातील मध्यवर्ती ठिकाण असल्याने सरदार पटेल महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून या परिसरात गुंड प्रवृत्तीचा धुमाकूळ सुरू असल्याने विद्यार्थिंनीमध्ये दहशतीचे वातावरण पसरले असल्याचे निवेदनात म्हटले आहे. निवेदन सादर करणाऱ्या शिष्टमंडळात रवी बनकर, प्रतिक गटलेवार, मोहित चुघ, तेजासिंग, राहुल गायकवाड, मयूर झाडे, शिवम त्रिवेदी, अभिनव लिंगोजवार, धनंजय मुफ्फलवार आदींचा समावेश होता. यासोबतच शहरातील विविध महाविद्यालय परिसरातही असे गुंड प्रवृत्तीचे युवक शाळा-महाविद्यालयात ये-जा करणाऱ्या मुलींना त्रास देत आहेत. शाळा भरण्याच्या व सुटण्याच्या काळात या ठिकाणी पोलीस तैनात करावे, अशीही मागणी पालकांकडून केली जात आहे. स्थानिक जनता कॉलेज परिसरात हा प्रकार मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याची माहिती आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी आहे. (प्रतिनिधी)
चंद्रपुरात गुंडांकडून विद्यार्थिनींची छेड
By admin | Updated: June 29, 2015 01:44 IST