समस्या सोडविणार : जिल्हाधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना आश्वासनचंद्रपूर : जवाहर नवोदय विद्यालय तळोधी येथे सुविधांचा अभाव असून या अडचणी व समस्या सोडविण्यासाठी आपल्या स्तरावरुन प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी विद्यार्थ्यांना दिले. नागभीड तालुक्यातील तळोधी (बाळापूर) येथील जवाहर नवोदय विद्यालयास जिल्हाधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली व विद्यार्थ्यांशी संवाध साधला. यावेळी त्यांच्यासोबत उपविभागीय अधिकारी दीपा मुधोळ , तहसीलदार श्रीराम मुंदडा व प्राचार्य सैबेवार उपस्थित होते.जुन्या वसतिगृहात बाथरुम व शौचालय आवश्यक प्रमाणात नसून त्यापैकी काही नादुरुस्त आहेत. स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीकोनातून अभ्यास करण्यासाठी आवश्यक पुस्तके उपलब्ध नाहीत. शाळेच्या वेळापत्रकानुसार विश्रांतीसाठी तसेच कमी वेळ मिळतो. शाळेमध्ये कॉईन बॉक्सची व्यवस्था करावी, अनेक दिवसापासून टाटा स्काय बंद असल्यामुळे बातम्या पाहता येत नाहीत. सूचना पेटी ठेवावी, पिण्याच्या पाण्यासाठी वसतिगृहाजवळ सोय व्हावी व वसतिगृहाच्या खिडक्याचे तावदाने दुरुस्त करावे अशा विविध समस्या व अडचणी विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितल्या.जिल्हाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या समस्या ऐकूण त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. आई - वडिलांनी खुप कष्ट घेऊन तुम्हाला इथे शिक्षणासाठी पाठविले आहे. त्यांच्या आपल्याकडून खुप अपेक्षा असून त्यांना कधीही निराश होऊ देऊ नका, असा मोलाचा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. तुमच्या सर्व समस्या मी ऐकल्या असून माझ्या स्तरावर जेवढ्या समस्या सोडविता येतील, त्या सर्व सोडविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी प्राचार्य व सर्व शिक्षकांशी चर्चा केली. या भेटीनंतर जिल्हाधिकारी डॉ. म्हैसेकर यांनी विद्यार्थ्यांसोबत रात्रीचे जेवण घेऊन तेथे मुक्काम केला. (शहर प्रतिनिधी)
जिल्हाधिकाऱ्यांचा नवोदय विद्यालयात मुक्काम
By admin | Updated: July 23, 2014 23:32 IST