बल्लारपूर : बल्लारशाह (बल्लारपूर) ते मुंबई दरम्यान थेट रेल्वेगाडी सुरू करावी अशी मागणी राज्यातील ९३ आमदारांनी रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांच्याकडे केली आहे. याकरिता बल्लारपूरचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार घेतला.रेल्वेमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात या आमदारांनी बल्लारशाह - मुंबई थेट गाडी का आवश्यक आहे, याचे कारण नमूद केले आहे. चंद्रपूर, गडचिरोली तद्वतच लगतच्या आंध्रप्रदेशातील सिमावर्ती भागातील नागरिकांना विविध कामांकरिता मुंबईला जावे लागते. त्यांना मुंबईला थेट जाण्याकरिता कोणतीही रेल्वे नाही. या कारणाने या क्षेत्रातील प्रवाशांना मुंबईला जाण्याकरिता अडचण निर्माण होते. बल्लारशाह मुंबई थेट रेल्वेने ही समस्या दूर होणार आहे. बल्लारशाह औद्योगिक आणि विदर्भातील महत्वाचे रेल्वे तसेच मध्यवर्ती आणि सोयीचे ठिकाण आहे. या सर्व बाबी लक्षात घेता थेट रेल्वे सुरु करणे आवश्यक आहे. बल्लारशाह ते मुंबई थेट रेल्वे सुरू करावी ही या क्षेत्रातील नागरिकांची जूनी मागणी आहे. याकडे रेल्वेमंत्र्यांचे शिष्टमंडळाने लक्ष वेधले. या संबंधात रेल्वे मंत्र्यांनी निवेदनकर्त्या आमदारांशी चर्चा करून सहा महिन्यात बल्लारशाह ते मुंबई थेट रेल्वे सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे. ही माहिती आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.औद्योगिक जिल्हा असल्याने मोठ्या संख्येने कामगार तसेच अधिकारी येथे आहे. मात्र त्यांना मुंबईला थेट जाण्यासाठी सोयीची रेल्वे नाही. त्यामुळे प्रवाशांना वर्धा किंवा नागपूरला प्रथम जावे लागते. यात त्यांचा वेळ आणि आर्थिक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे बल्लारशाह ते मुंबई अशी ट्रेन सुरुझाल्याने प्रवाशांना सोयीचे होणार आहे. यासाठी रेल्वे प्रशासनाची इच्छाशक्तीची गरज आहे. (तालुका प्रतिनिधी)
बल्लारशाह-मुंबई थेट गाडी सुरू करा
By admin | Updated: August 4, 2014 23:40 IST