विद्यार्थ्यांची तक्रार : लाखो रुपये घेऊन फसविलेचंद्रपूर: शिकवणीच्या नावाखाली अनेक विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये घेऊन फरार झालेल्या निशांत वाघमारे नामक संचालकाला शहर पोलिसांनी वर्धा येथे जेरबंद केले. आरोपी निशांत वाघमारे याचा स्थानिक रघुवंशी कॉम्प्लेक्समध्ये मागील दोन ते तीन वर्षांपासून ड्रीम प्वॉइंट सायन्स अकॅडमी नावाने कोचिंग क्लासेस सुरू होते. या ठिकाणी जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व गणित या विषयांवर शिकवणी घेण्यासाठी निशांत वाघमारे याने जवळपास ४० विद्यार्थ्यांजवळून प्रत्येकी ३५ हजार रुपये घेतले. यातील १२ वीला शिकणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांनी डिसेंबर २०१४ मध्ये या कोचिंग क्लासेसमध्ये प्रवेश घेतला. मात्र काही महिने शिकविल्यानंतर अचानक कोचिंग क्लासेस बंद करून निशांत वाघमारे फरार झाला. दरम्यान, विद्यार्थ्यांनी त्याच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क केला असता, त्याने प्रत्येकवेळी कारणे देऊन टाळण्याचा प्रयत्न केला. मागील दोन महिन्यांपासून तर त्याच्याशी संपर्कही झाला नाही. दरम्यान, याच कोचिंग क्लासेसचा विद्यार्थी सागर वरघने याने एप्रिलमध्ये निशांत वाघमारे याच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. तक्रारीवरून पोलिसांनी वाघमारेविरुद्ध भादंवि ४२०, ४०६ अन्वये गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला होता. शुक्रवारी गोपनिय माहितीच्या आधारे चंद्रपूर शहर पोलिसांनी वर्धा येथे जाऊन त्याला अटक केली. या कोचिंग क्लासेसमधील अनेक विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. या विद्यार्थ्यांनी किस्त पाडून पैशाचा भरणा केला. (प्रतिनिधी)
कोचिंग क्लासेसच्या संचालकाला अटक
By admin | Updated: June 28, 2015 01:51 IST