चंद्रपुरातील घटना : नागरिक भयभीत, पोलिसांत तक्रारचंद्रपूर : अज्ञात माथेफिरूने चंद्रपुरातील संजयनगर येथील काही घरांना लक्ष करून मागील दोन दिवसांपासून दगडफेक करीत आहे. मात्र सोमवारी रात्री चक्क विटांचे तुकडे व मोठे दगड घरावर फेकल्याने नागरिकांमध्ये भितेचे वातावरण पसरले आहे. या घटनेबाबत रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. घरांवर दगडफेक करण्याची घटना चंद्रपूरकरांसाठी नवी नाही. या अगोदरही बाबूपेठ, तुकूम येथील रहिवाश्यांनी हा थरार अनुभवला आहे. मात्र हे दगड कुठून येतात आणि कोण फेकतो, याचा शोध पोलिसांच्या तपासातही लागला नव्हता, हे विशेष ! तुकूम परिसरात दगड फेकणाऱ्यांनी मोठा कहरच केला होता. स्थानिक नागरिकांनी अख्खी रात्रं जागून काढली तर पोलिसांनीही गस्त लावली होती. मात्र काय प्रकार आहे आणि दगड कोण, कशासाठी फेकत होता, याचा शोध लागला नव्हता. आता पुन्हा असाच प्रकार संजयनगर वार्डात सुरु आहे. मागील दोन-तीन दिवसांपासून येथील रहिवासी नरेश सावू, अशोक नागापुरे, सावू यांच्या घरांवर अज्ञात माथेफिरूनी दगडफेक केली. सोमवारी रात्री तर घरावर चक्क विटा आणि मोठे दगड पडले. सुदैवाने या घटनेत कुणीही जखमी झाले नाही. मात्र घरांचे कवेलू फुटल्याने मोठे नुकसान झाले. या सर्व घटनेनंतर स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या भागात पोलीस नियमित गस्त करीत नाही. त्यामुळे या भागात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असल्याचा आरोप प्रभागाच्या नगरसेविका वनश्री गेडाम यांनी केला आहे. त्यांनी आज काही महिलांसह रामनगर पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली. मात्र दगड फेकणाऱ्याचा शोध लागला नाही. (स्थानिक प्रतिनिधी)
माथेफिरूकडून घरांवर दगडफेक
By admin | Updated: February 22, 2017 00:45 IST