ई-रिक्षा धोरणाचा निषेध : ७ हजार आॅटोरिक्षा चालकांचा बंदचंद्रपूर : केंद्र व राज्यसरकारने देशभरात ई-रिक्षा सुरू करण्याचे धोरण स्वीकारले आहे. यामुळे सध्याचा आॅटो व्यवसाय अडचणीत येणार असून हजारो आॅटोचालकांवर उपासमारीची वेळ येणार आहे. शासनाच्या ई-रिक्षा धोरणाचा निषेध करण्यासाठी आॅटोरिक्षा चालकांनी बुधवारी जिल्हाभरात आॅटो बंद ठेवून शासनाचे लक्ष वेधले. यामध्ये जिल्हाभरातील ७ हजार आॅटोरिक्षा चालक सहभाग झाले होते. त्यामुळे चंद्रपूर शहरासह इतर महत्त्वाच्या शहरातील वाहतुकीची गती मंदावली व प्रवाश्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. या आंदोलनात आॅटोरिक्षासह मिनीडोर आॅटो, टाटा मॅजिक चालक आणि मालक सहभागी झाले होते. केंद्र सरकारने आॅटोरिक्षाचे इन्शुरंस कमी करावे, ई-रिक्षा धोरण लागू न करणे, आॅटोचालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करणे, आॅटोचालकांसाठी म्हाडा कॉलनीमध्ये घरे उपलब्ध करून देण्यात यावे, चंद्रपूर शहरात व जिल्ह्यात आॅटोरिक्षासाठी अधिकृत आॅटोटॅन्ड निर्माण करणे, अवैध वाहतुकीवर प्रतिबंध घालणे, नवीन वाहनांना पाच वर्षाकरिता परमीट व नवीन नूतनीकरण ५ वर्षाकरिता करून देणे, विना परवानाधारक मारोती व्हॅन, सुमो, टाटा मॅझीकने विद्यार्थ्यांना ने-आण करणाऱ्यांवर कारवाई करावी, ग्रामीण आॅटोरिक्षाला मिटरची सक्ती करण्यात येऊ नये आदी मागण्यांकडे आंदोलनातून लक्ष वेधण्यात आले. दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, वाहतूक पोलीस निरीक्षक यांची आॅटोरिक्षा शिष्टमंडळाने भेट घेऊन मागण्यांचे निवेदन दिले. सायंकाळी ६ वाजता पूर्ववत आॅटोरिक्षा सुरू करण्यात आले.या आंदोलनात आॅटोरिक्षा संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र खांडेकर, अब्बास शेख, मोक्षवीर लोहकरे, बाळू उपलेंचीवार, बळीराम शिंदे, दादाजी शिट्टलवार, अनिल बोधाणे, जाकीर शेख, बंडू भगत, धनराज जीवने, कुंदर रायपुरे, मधुकर राऊत, मुजफर खान, विनोद चन्ने, अनिल धंदरे यांच्यासह आॅटोचालक संघटनेचे शेकडो चालक सहभागी झाले होते. (स्थानिक प्रतिनिधी)
आॅटोेच्या चाकांनी मंदावली शहरांची गती
By admin | Updated: September 1, 2016 01:21 IST