महावितरणचा उपक्रम : अनधिकृत वीज जोडणीवर ठेवणार लक्षचंद्रपूर : सार्वजनिक गणेश मंडळांनी गणेशोत्सवासाठी वीज सुरक्षेबाबत गांभीर्याने उपाययोजना कराव्यात व ३ रुपये ७१ पैसे प्रतियुनिट या सवलतीच्या दराने उपलब्ध असलेली अधिकृत तात्पुरती वीजजोडणी घ्यावी, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.गणेश मंडळांना सहजपणे वीज जोडणी मिळावी, याकरिता महावितरणद्वारा विशेष पथकाची स्थापना करण्यात आली असून हे पथक ठिकठिकाणी गणेश मंडळांना भेटी देवून, वीज जोडणी उपलब्ध करून देण्यास मदत करणार आहेत. गणेश मंडळांना त्यांच्या दारी ‘आॅन द स्पॉट’ तात्पुरती वीज जोडणी गणेशोत्सवाच्या काळात मिळण्यासाठी या पथकांद्वारे ए-१ अर्ज उपलब्ध करून देण्ो व भरून घेणे, टेस्ट रिपोर्ट उपलब्ध करून देणे व वीज जोडणीसाठी लागणारे शुल्काची डिमांड देणे ईत्यादी मदत या पथकाद्वारे करण्यात येणार आहे. विजेचा अनधिकृत वापर हा धोकादायक असतो, व त्यामुळे जीवित अथवा आर्थिक नुकसान होवू शकते. त्यामुळे विजेच्या अनधिकृत वापरावर हे पथक विशेष लक्ष ठेवणार आहे. चंद्रपूर मंडळाचे अधीक्षक अभियंता हरीश गजबे व विद्युत निरिक्षक प्रदिप चामट यांच्या हस्ते पथकास हिरवी झेंडी दाखविली. यावेळी चंद्रपूर विभागाचे कार्यकारी अभियंता विनोद देशपांडे व वीज कंपनीचे कर्मचारी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)
गणेश मंडळांना वीज जोडणीसाठी खास पथक
By admin | Updated: September 1, 2016 01:22 IST