चंदनखेडा : ‘वनहक्क दावे शिल्लक नाहीत’ असे सांगत गावोगावीच्या वनहक्क समित्यांकडून प्रमाणपत्र मागण्याचे काम सध्या जिल्हा प्रशासनाकडून युद्धपातळीवर सुरू आहे. त्यासाठी आयोजित केल्या जाणाऱ्या विशेष ग्रामसभा वनहक्क समित्यांचे यापूर्वी योग्य प्रशिक्षण न झाल्यामुळे तहकूब होत आहे. नुकतेच चंदनखेडा व आष्टा येथे याबाबत घेतलेल्या विशेष ग्रामसभा तहकूब झालेल्या आहे.निवडणुका तोंडावर आल्यामुळे शासनाकडून घाईगडबडीने वनहक्क दावे निकाली काढण्याचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले आहेत. त्यानुसार वनहक्क दावे संपविण्याचे काम विशेष ग्रामसभा घेऊन युद्धपातळीवर सुरु आहे. परंतु भद्रावती तालुक्यात यासंबंधीची म्हणावी तशी जनजागृती शासनस्तरावरुन न झाल्याने ग्रामस्थ या ग्रामसभाकडे पाठ फिरवित आहे. त्याचे अज्ञान असे की, जमिनीचे पट्टे देण्याचे काम शासनाचे आहे, ते करतीलच. परंतु वनहक्क समितीच्या माध्यमातून हे काम होणे अभिप्रेत आहे हे लोकांना माहित आहे. नुकतेच चंदनखेडा, आष्टा येथील आयोजित ग्रामसभा तहकूब झालेल्या आहे. गठित केलेल्या वनहक्क समितीत मी सदस्य वा सचिव हेच त्या सदस्याला माहित नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे सभेला उपस्थित असणे दूरच व त्यांचे प्रशिक्षण त्याहून कोसोदूर आहे. प्रशासनाची अनास्था व दुर्लक्षितपणामुळे ग्रामीण भागात जनजागृती झालीच नाही. काही गावांमध्ये सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन जनजागृती घडवून आणली, तो अपवाद.या संबंधातील जनजागृती प्रशिक्षणांच्या माध्यमातून उपविभागीय अधिकाऱ्यांकडून कार्यान्वित करणे गरजेचे होते. परंतु मागील दोन वर्षात गावस्तरापर्यंत काहीच करण्यात आले नाही. आता शासनाची लगीनघाई सुरु झाल्याबरोबर वनहक्क दावे निकालात निघून ते पूर्णत: संपल्याचे प्रमाणपत्र घेणे सुरू झालेले आहे. सन २००५ पूर्वी घर किंवा शेतीकरिता अतिक्रमित केलेल्या वनजमिनीचा पट्टा नियमित मालकी हक्काचा होणार आहे. मात्र त्या दाव्यासोबत तसा पुरावा जोडणे गरजेचे आहे. या घाईगडबडीत अवैध दावेसुद्धा निकाली निघण्याची शक्यता आहे. प्रशिक्षणाअभावी बऱ्याचशा गावांमध्ये वनहक्क दावे कदाचित प्रलंबित नसतील. पण ते संपलेले मात्र नाही, हे सुद्धा वास्तव आहे. (वार्ताहर)
प्रशिक्षणाभावी विशेष ग्रामसभा होत आहे तहकूब
By admin | Updated: July 30, 2014 23:56 IST