लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत वाहतुकीवर निर्बंध असल्याने अपघाताचे प्रमाण शुन्यावर आले होते. मात्र दुसरी लाट ओसरायला लागल्याने प्रशासनाने निर्बंध हटविले. त्यामुळे अपघाताच्या संख्येतही वाढ झाली आहे. पूर्वी जिल्हा सामान्य रुग्णालयात अपघाताचे एक किंवा दोन रुग्ण पेशंट यायचे. परंतु, आता ही आकडेवारी वाढली असून दिवसाला चार ते पाचजण येत असल्याचे चित्र आहे.कोरोनाला आळा घालण्यासाठी प्रशासनाने कठोर निर्बंध लादले. परिणामी अत्यावश्यक सेवेतील वाहनाला परवानगी होती. त्यातच कोरोनाच्या दहशतीने घराबाहेर पडणाऱ्यांची संख्याही अत्यल्प होती. त्यामुळे अपघाताची संख्या कमी झाली होती. परंतु, मागील दोन महिन्यांपासून कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने निर्बंध हटविले आहेत. त्यातच मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात दारु सुरु झाली आहे. परंतु, कोरोनामुळे ब्रेथ ॲनेलायझरच्या वापरावर निर्बंध लादले आहेत. त्यामुळे दारु पिऊन वाहन चालविणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. परिणामी अपघाताच्या संख्येत वाढ होत आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयासह उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र येथेसुद्धा अपघाताचे रुग्ण येण्याच्या संख्येत वाढ झाली आहे.
दारू हेही एक कारण
चंद्रपूर जिल्ह्यात १ एप्रिल २०१५ मध्ये दारुबंदी करण्यात आली होती. मात्र सहा वर्षानंतर जुलै २०२१ मध्ये दारुबंदी हटविण्यात आली. त्यातच कोरोनामुळे ब्रेथ ॲनेलायझरच्या वापरावर पोलिसांना निर्बंध लादन्यात आले आहे. त्यामुळे दारु पिऊन वाहन चालविणाऱ्याचे चांगलेच फावत आहे. त्यामुळसुद्धा अपघाताची संख्या वाढत चालली आहे.