कामगारांचे आंदोलन : मागण्यांची पूर्तता करण्याची मागणीसास्ती : अनेक वर्षांपासून कंपनीत काम करूनही कंपनी व्यवस्थापनाकडून कोणत्याही सोईसुविधा पुरविल्या नाही. कामगारांच्या हक्काच्या मागण्या पूर्ण न करता कामगारांनाच कामावरुन काढून टाकण्याचे काम कंपनी व्यवस्थापन करीत आहे. या कारवाई विरोधात कामगारांनी १४ सप्टेंबरपासून आंदोलन सुरु करून कामावरुन काढलेल्या कामगारांना कामावर घेऊन इतर मागण्या पूर्ण करण्याची मागणी केली आहे.राजुरा तालुक्यातील वरुर रोड येथे सोलर इंडस्ट्रीज इंडिया लि. कंपनी आहे. या कंपनीत परिसरातील कामगार कामावर आहेत. बऱ्याच वर्षांपासून काम करूनही येथील कामगारांना कंपनी व्यवस्थापनाकडून कोणत्याही सुविधा पुरविल्या गेल्या नाही. तर कामगारांच्या हक्काच्या मागण्यासुद्धा पूर्ण केल्या नाही. येथील कामगारांना वेज बोर्डानुसार वेतनही दिल्या जात नाही. त्यामुळे कामगारांचे शोषण होत असल्याने येथील कामगारांनी एकत्रीत येऊन सोलार कामगार संघटना स्थापन केली. कामगार संघटनेच्या माध्यमाातून कामगारांच्या मागण्या पूर्ण करण्याचे निवेदन कंपनी व्यवस्थापनाला दिले. परंतु, कंपनी व्यवस्थापनाने आपली मनमानी दाखवीत येथे कार्यरत स्थानिक चार कामगारांना कामावरुन काढून टाकून त्यांच्या जागी बाहेरील कामगारांना कामावर घेतले. कामावरुन काढून टाकल्यामुळे कामगारांवर उपासमारीची पाळी आली आहे. कामगागारांवर दबाव टाकण्यासाठी कंपनी व्यवस्थापन असे करीत असून, बेकायदेशीरपणे कामावरुन काढून टाकलेल्या कामगारांना कामावर घेणे व इतर मागण्यांच्या पूर्ततेसाठी सोलार कामगार संघटनेच्यावतीने आंदोलन सुरु केले आहे. मागण्यांची पूर्णता त्वरित न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सोलार कामगार संघटनेचे कार्याध्यक्ष संतोष पिदूरकर, अध्यक्ष नंदलाल वर्मा, सचिव गिरीश रणदिवे, प्रभाकर गांदगीवार, वसंता मोढे, गणेश लोखंडे, रवी मेडपल्लीवार, प्रफुल्ल मोंढे, मुकेश ढोबे, रंजित बोरकुटे, सुरेश उपटलावार यांनी दिला आहे. (वार्ताहर)
सोलर इंडस्ट्रिज इंडिया कंपनीने कामगारांना काढले
By admin | Updated: September 17, 2014 23:42 IST