माणिकगड पहाडातील डोंगर-दऱ्यातून गडचांदूरकडून जिवतीकडे जाणाऱ्या मार्गावर हा किल्ला आहे. किल्ला उंचावर असल्याने अतिशय प्रेक्षणीय व रमणीय आहे. त्यामुळे दरवर्षी लाखो पर्यटक येथे भेटी देतात. येथील पूर्वापार इतिहासाची माहिती लोकापर्यंत पोहोचण्याच्या दृष्टिकोनातून येथे शिल्पे तयार करून सौंदर्यीकरण करण्यात यावे, अशी मागणी होत आहे.
जिल्ह्यात चंद्रपूर, भद्रावती येथे विविध प्रकारच्या चौकाचौकात शिल्पे तयार करून सौंदर्यीकरण करण्यात आले. त्यामुळे या चौकांचे रूपडे पालटले आहे. तसेच ही शिल्पे माहिती दर्शक असल्याने त्याचा फायदा अभ्यासकांना होत आहे. पाच वर्षापूर्वी या किल्ला परिसराचे सौंदर्यीकरण करण्यात आले. यामुळे येथे दूरवरून येणाऱ्या पर्यटकांचा ओघ वाढला. त्यामुळे वनविभागाकडे उत्पन्नाचे स्रोत निर्माण झाले. येथे अशा प्रकारची शिल्पे उभारल्यास परिसरातील सौंदर्य अधिकच खुलून दिसेल. पर्यटकही नव्याने आकर्षिली जातील, त्यादृष्टीने प्रशासनाने प्रयत्न करावे, अशी मागणी होत आहे.