घुग्घुस : वणीकडून संशयास्पद स्थितीत येणाऱ्या एका वाहनास बेलोरा एसएसटी पाॅईंटवर अडवून वाहनांची झडती घेतली असता १ लाख ३० हजार रुपये किमतीच्या १३ पेटी दारू आढळून आली. घुग्घुस पोलिसांनी वाहनासह दारू जप्त केली.
बुधवारी रात्री उशिरा यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातून टाटा इंडिगोमध्ये ( क्र.एमएच ३३ ए १३१३) १३ पेटी देशी दारू घुग्घुस हद्दीत येत असताना वर्धा नदीच्या सीमेलगत बेलोरा एसएसटी पॉईंटच्या पोलीस चौकीवर घुग्घुस पोलिसांनी वाहनास थांबवून तपासणी केली असता त्यात १३ पेटी अवैध देशी दारू आढळून आली. दारू तस्करी प्रकरणात महेश शंकर बासमपेल्ली (वय २९, रा. रामनगर, घुग्घुस) याला अटक केली. देशी दारू किंमत एक लाख ३० हजार, वाहन किंमत पाच लाख व एक मोबाईल किंमत १० हजार असा एकूण सहा लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
सदर कारवाई प्रभारी ठाणेदार गोरक्षनाथ नागलोत यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक मेघा गोखरे, किशोर रिंगोले व सुरेश पढाल यांनी केली.