लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा (पीकेव्ही) विस्तार फार मोठा आहे. त्यामुळे येत्या दोन-तीन वर्षांत या विद्यापीठाचे विभाजन करून सिंदेवाही येथे नवीन कृषी विद्यापीठ व वनविद्या महाविद्यालयात निर्माण करण्यास आपले प्राधान्य आहे. हा संपूर्ण परिसर वनांनी व्यापला असल्यामुळे येथे लवकरच वनविद्या महाविद्यालय सुरू करण्यात येईल. या दोन्ही बाबतींत राज्य शासन सकारात्मक असल्याची माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. स्व. वसंतराव नाईक जयंतीनिमित्त सिंदेवाही येथील कृषी विज्ञान केंद्रात शेतकऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण सभापती नागराज गेडाम, जिल्हा परिषदेचे सदस्य रमाकांत लोधे, सभापती मंदा बाळबुधे, उपसभापती शीला कन्नाके, मधुकर मडावी, कृषी विज्ञान केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. कोल्हे, डॉ. नागदेवते, डॉ. वेलादी, डॉ. सिडाम, प्रकाश देवतळे, आदी उपस्थित होते. यावेळी कृषिभूषण पुरस्कारप्राप्त शेतकरी दिनेश शेंडे व गुरुदास मसराम पालकमंत्र्यांनी सत्कार केला.
१८२ कोटींचा प्रस्तावसिंदेवाही येथील कृषी विज्ञान केंद्राच्या जागेवर वनविद्या महाविद्यालय स्थापन झाल्यास वनउपजांपासून शेतीला पूरक औषधी निर्माण होईल. या विषयावर वनविद्या महाविद्यालयात सखोल संशोधन केले जाईल. देशभरातील कृषी शास्त्रज्ञ येथे येण्यासाठी तयार आहेत. सिंदेवाही वनविद्या महाविद्यालय उभारण्यासाठी १८२ कोटींचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला, अशी माहितीही पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.