दारूचा महापूर : विद्यमान पोलीस अधिकारी हतबलब्रह्मपुरी : शहरातील चौकाचौकांत आणि तालुक्यातील गावोगावांत अवैध दारू विक्रीने कळस गाठला आहे. बाजारात दुकानदारांकडून ग्राहकाला ओढण्याची जशी स्पर्धा लागते, तशी स्पर्धा दारूविक्रेत्यांनी सुरू केल्याने दारूचे भाव पूर्वीच्या किंमतीपेक्षा कमी झाले आहे. पूर्वीपेक्षा कमी किंमतीने खुलेआम विकली जात आहे. परंतु त्यावर प्रतिबंध लावण्यात पोलीस यंत्रणा कमजोर ठरत आहे. त्यामुळे या दारूविक्रीवर निर्बंध आणायचे असेल तर एखादा ‘सिंघम’ पोलीस अधिकारी येथे आवश्यक असल्याचा सूर नागरिकांमध्ये उमटत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.एक-सव्वा वर्षापूर्वी जिल्ह्यात दारूबंदी करण्यात आली. ब्रह्मपुरी तालुक्यात व शहरात सुरवातीला एक दोन महिने दारू नसल्याचे चित्र होते. परंतु हळूहळू दारूने आपले पाय रोवायला सुरवात केली. आजघडीला दारूचे पाय एवढे भक्कम रोवल्या गेले की, त्याचे पाळेमुळे गावखेड्यात व चौकाचौकात घट्ट रोवल्या गेली आहेत. यापूर्वी अवैध दारू विक्रीच्या केसेस झाल्या. परंतु झाडाच्या फांद्या छाट्याव्या, तशा या कारवाया झाल्यात. त्या झाडाची पाळेमुळे किती खोलपर्यंत व सर्वदूर पसरलेली आहे, याचा शोध घेऊन अश्या प्रकारची कार्यवाही अजूनही न झाल्याने अवैध दारू विक्रीची पाळेमुळे खोलवर रूजल्या गेली आहेत. एक काळ असा होता की, जिल्ह्यात दारूबंदी नव्हती. परंतु ब्रह्मपुरी तालुक्यात दारूबंदी असल्याचे चित्र निर्माण झाले होते. परदेसी नावाच्या अधिकाऱ्याने शहरात व तालुक्यात दारूबंदी नसताना दारूबंदीचे चित्र निर्माण केले होते. खुलेआम दुकानात किंवा बिअरबारमध्ये जायला अनेकांना धडकी भरत होती. त्यावेळी दुकानदार ग्राहकांची वाट बघत होते. ग्राहक परिस्थिती पाहून घाईघाईत आपले हाती घेतेलेले मद्यप्राशनाचे कार्य पार पाडीत असत. मद्यपींमध्ये ‘त्या’ अधिकाऱ्याची एवढी भिती होती की, परवाना दाखवा अन्यथा गाडीमध्ये बसा, असा फतवाच त्यांनी काढला असल्याने घेणारा व विकणारा या दोघांचेही धाबे दणाणले होते. हे चित्र दारूबंदीच्या एक वर्षापूर्वी शहरातील व गावखेड्यातील लोकांनी अनुभवले आहे. आता तर रितसर दारूबंदी झालेली असुनही ती नसल्यासारखीचे चित्र निर्माण झाले आहे. ब्रह्मपुरीच्या शिवाजी चौकात, रेणुकामाता चौकात, पेठवॉर्ड, कुर्सा, बोंडेगाव, हनुमाननगर, गांधीनगर, देलनवाडी व अन्य चौकात तसेच प्रत्येक खेड्यात दारूचा उत आला असतानाही अप्रत्यक्ष परवाना दिल्याचे चित्र निर्माण झाले आहे. दारूविक्रेते परवानाधारकाप्रमाणे बिनधास्त विकत आहेत. कुणालाच कसलीही भिती असल्याचे वाटत नाही, असे चित्र निर्माण झाल्याने विद्यार्थीही या कामात गुंतले असल्याची चर्चा आहे. स्कूल बॅगचा वापर पुस्तकांऐवजी दारूसाठी होत असल्याने विद्यार्थ्याचे शैक्षणिक जीवन उद्ध्वस्त होत आहे. कमी घामात जास्त दाम मिळत असल्याने विद्यार्थी सहज या व्यवसायाकडे आकृष्ट होताना दिसून येत आहे. परंतु या व अशा गंभीर समस्येकडे पाहीजे त्या प्रमाणात कोणताही अधिकारी लक्ष घालत नसल्याने सर्वत्र आलबेल असे वातावरण निर्माण झाले. अशावेळी सर्वांना आठवण येते परदेसी नावाच्या पोलीस अधिकाऱ्याची. आता त्याच दिवसासाठी व अवैध दारूबंदीवर आळा घालण्यासाठी सिंघम म्हणून ज्यानी कामगिरी या भागात बजावली होती, त्यांचे नाव पुन्हा अनेक सुजाण नागरिकांच्या तोंडून निघत आहे. त्यामुळे तालुक्याच्या व शहराच्या अवैध दारूबंदीला हवाय सिंघम प्रशासनाने येथे पाठवावा, अशी मागणी आहे. (तालुका प्रतिनिधी)
तालुक्यातील अवैध दारूबंदीसाठी हवाय सिंघम!
By admin | Updated: February 1, 2016 01:05 IST