चंद्रपूर : विदर्भामध्ये सिकलसेलग्रस्त रुग्णांची संख्या फार मोठ्या प्रमाणात असून चंद्रपूर जिल्ह्यात व लगतच्या जिल्ह्यांमध्येही सिकलसेलचे रुग्ण प्रचंड संख्येमध्ये आहे. त्यामुळे या रुग्णांचे योग्य निदान व प्रभावीरित्या उपचार व्हावेत आणि सिकलसेलबाबत अद्ययावत संशोधन होण्याकरिता भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद नवी दिल्लीअंतर्गत सिकलसेल सॅटेलाईट सेंटरची उभारणी चंद्रपूर शहरात करण्यात आली आहे. अल्पावधीतच अत्याधुनिक सोयी-सुविधांनी सुसज्ज असे हे सेंटर सुरू करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती केंद्रीय रसायन व उर्वरक राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी शनिवारी येथे दिली.स्थानिक क्षयरोग रुग्णालयात २७ जून रोजी आयोजित सिकलसेल सॅटेलाईट सेंटर इमारतीच्या नुतनीकरण शुभारंभ कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमास आयसीएमआरचे डॉ.मलायी मुखर्जी, भाजपा महानगरचे अध्यक्ष विजय राऊत, डॉ.एम.जे.खान, डॉ.भुक्ते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्रीराम गोगुलवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.मुरंबीकर, सार्वजनिक बांधकाम मंडळाचे अधीक्षक अभियंता बालपांडे, डॉ.प्रसाद पोटदुखे, दामोदर मंत्री, मधुसूदन रुंगठा, डॉ.गुलवाडे, डॉ.दुदीवार, डॉ.भलमे, अनिल फुलझेले, सुभाष कासनगोट्टूवार, अंजली घोटेकर, राहुल सराफ, मोहन चौधरी, राहुल पावडे, देवानंद वाढई, ज्योती भूते, वनश्री गेडाम, स्वरूपा आसवानी, नागोसे, माया उईके, मनिषा पुराणिक, राजू घरोटे आदींची उपस्थिती होती.ना. अहीर पुढे म्हणाले, सिकलसेल रुग्णांच्या स्थायी उपचाराकरिता प्रभावी सुविधा नसल्याने तसेच या आजारावर नियंत्रण ठेवण्याकरिता उपचार पद्धती विकसीत नसल्यामुळे चंद्रपुरातील हे सिकलसेल सॅटेलाईट सेंटर या रुग्णाकरिता वरदान ठरेल असा विश्वास व्यक्त करतानाच केंद्रीय राज्यमंत्री अहीर म्हणाले की, चंद्रपुरातील या सिकलसेल अनुसंधान केंद्रास देशातले पहिले रुग्णालय बनविण्यासाठी आपण प्रयत्नरत असून या रुग्णालयासाठी लवकरच अद्ययावत यंत्रसामग्री व कर्मचारी वर्ग उपलब्ध केला जाईल असेही त्यांनी याप्रसंगी सांगितले.या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना आयसीएमआरचे डॉ.मलायी मुखर्जी यांनी या सिकलसेल सॅटेलाईट सेंटरमुळे चंद्रपूर जिल्ह्यातीलच नव्हे तर विदर्भातील सिकलसेलग्रस्त रुग्णांना फार मोठी सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न कसोशीने केला जाईल असे सांगितले. (शहर प्रतिनिधी)
सिकलसेल सॅटेलाईट सेंटर सोयी सुविधांनी सुसज्ज असेल - हंसराज अहीर
By admin | Updated: June 28, 2015 01:46 IST