चंद्रपूर: राज्यातील युतीच्या सत्तेत भाजपासोबत असलेल्या शिवसेनेतील आमदार बाळू धानोरकर यांनी सरकारविरोधातच आंदोलन पुकारण्याचा इशारा दिला आहे. दुष्काळबाधित शेतकऱ्यांना मदत, चंद्रपूर जिल्ह्यातील प्रदुषण आणि कर्मचाऱ्यांना प्रदुषण भत्ता तसेच सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत होणारा धान्याचा काळाबाजार या विषयांवरून भाजपाला घेरण्याची तयारी शिवसेना जिल्हाप्रमुख असलेले आमदार बाळू धानोरकर यांनी चालविली आहे.या प्रश्नांना येत्या १० दिवसात न्याय मिळाला नाही तर, ४ मार्चला चंद्रपुरात युती सरकार विरूद्ध निषेध मोर्चा काढण्याचा इशाराही त्यांनी पत्रकार परिषदेतून दिला आहे.राज्य सरकारने दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी हेक्टरी साडेचार हजार रूपयांची मदत जाहीर केली असली तरी, शेतकरी अल्पभूधारक असण्याची अट घातली आहे. ही अट जाचक असल्याने सर्वच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळणे शक्य नाही. त्यामुळे ही अट रद्द करून सरसकट मदतवाटप करावी, अशी मागणी त्यांनी केली. चंद्रपूर जिल्ह्यात खाणींचे प्रमाण अधिक असून औद्योगिकरणही वाढले आहे. मात्र त्यामळे प्रदुषणात भर पडली असून जनसामान्यांच्या आरोग्यावर प्रभाव पडत आहे. प्रदुषण पसरविणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करून वरोरा, भद्रावती, चंद्रपूर, बल्लारपूर, राजुरा, कोरपना, मूल या तालुक्यात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता लागू करण्याचीही त्यांची मागणी आहे.स्वस्त धान्य दुकानातून एपीएल धारकांना मिळणारे धान्य बंद करण्यात आले आहे. ते पूर्ववत सुरू करावे, पाच किलो वजनाचे घरगुती गॅसचे सिलिंडर स्वस्त धान्य दुकानामार्फत उपलब्ध करून द्यावे, तसेच धान्याचा काळाबाजार टाळण्यासाठी थेट दुकानापर्यंत माल पोहचवून द्यावा, अशीही त्यांची मागणी आहे.जिल्ह्यातील जनतेला न्याय मिळावा यासाठी आपण मंत्रीस्तरावर पाठपुरावा केला. मात्र प्रश्न कायमच असल्याने नाईलाजाने आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागत असल्याचे त्यांनी एका उत्तरात स्पष्ट केले. (जिल्हा प्र्रतिनिधी)आपले हे आंदोलन म्हणजे पक्षाचा जिल्हाध्यक्ष या नात्याने घेतलेली वयैक्तिक भूमिका आहे. भाजपाविरूद्ध अथवा भाजपातील कुण्या नेत्यांविरूद्ध हे आंदोलन नसून जनसामान्यांच्या प्रश्नावर उभारलेला हा लढा आहे. शिवसैनिक या नात्याने आपली भूमिका आधीपासूनच लढण्याची राहीली आहे. त्यामुळे सत्ता पक्षाचा आमदार असलो तरी जनसामान्यांचे प्रश्न वाऱ्यावर सोडणार नाही. - बाळू धानोरकर, आमदार
युतीविरोधात शिवसेना उतरणार रस्त्यावर
By admin | Updated: February 24, 2015 01:54 IST