चंद्रपूर : लाखो रुपये खर्च करून बंगाली कॅम्प सुभाष चौक ते सावरकर चौक रस्ता तयार करण्यात आला. मात्र अवघ्या चार महिन्यात रस्त्याची अक्षरश: चाळण झाली. त्यामुळे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेचे मनोल पाल यांच्या नेतृत्त्वात सोमवारी सकाळी ११ वाजता बंगाली कॅम्प सुभाष चौकात अभिनय आंदोलन केले. यावेळी वाहनचालकांना गुलाब पुष्प आणि बॅन्डेडपट््या व मलम भेट देऊन काळजी घेण्याचे आवाहन केले.चंद्रपूर-मूल मार्गावर दररोज वाहनांची मोठी वर्दळ असते. भरधाव धावणाऱ्या मोठ्या वाहनांमध्ये बंगाली कॅम्प सुभाष चौक ते सावरकर चौक या रस्त्याची दुरवस्था झाली होती. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम क्र. २ विभागामार्फत नवीन रस्ता बांधण्यात आला. या बांधकामाचे कंत्राट कृष्णा गुप्ता यांच्या मालकीच्या लक्ष्मी कंस्ट्रक्शन कंपनीला देण्यात आले होते. ८९ लाख ४ हजार २३५ रुपये खर्च करून रस्ता बांधण्यात आला. मात्र कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याने अवघ्या दोन महिन्यात रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या मार्गावर अपघाताच्या अनेक घटना घडल्या असून काही निष्पाप नागरिकांना गंभीर दुखापत झाल्या आहेत. त्यामुळे रस्ता दुरुस्तीसाठी शिवसेनेचे मनोज पाल यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देऊन तीन दिवसाचा अल्टीमेट दिला होता. परंतु, सार्वजनिक बांधकाम विभागाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचे हे आंदोलन करण्यात आले. आताही रस्ता दुरुस्त न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. (शहर प्रतिनिधी)
शिवसेनेने वाहनधारकांना वाटले बॅन्डेट पट्ट्या व मलम
By admin | Updated: September 15, 2015 03:17 IST