ब्रह्मपुरीत थकीत मालमत्ताधारकांवर जप्ती : फौजदारी गुन्हा दाखल करण्याची तंबीब्रह्मपुरी : शासनाने १०० टक्के कर वसुलीचे उद्दिष्ट दिले असून ब्रह्मपुरी नगर परिषदेने कराचा भरणा करण्यासाठी यापूर्वी बिल, नोटीस व अंतीम नोटीस व अधिपत्र दिले. मात्र अद्यापही बहुतांश मालमत्ताधारकांनी कराचा भरणा न केल्याने सोमवार व मंगळवारी नगर परिषदेच्या जप्ती पथकाने कार्यवाही करून ब्रह्मपुरीतील सात दुकानांना सील ठोकले. ब्रह्मपुरी नगर परिषद क्षेत्रातील ज्या मालमत्ताधारकांकडे मालमत्ता कर व पाणीपट्टी कर वर्षानुवर्ष भरले नाही, त्यांना यापूर्वी अनेकदा लक्षात आणून दिले आहे. शासनाने अशांवर भर देऊन वसुली करण्यासंबंधीचे आदेश काढले. त्यामुळे ब्रह्मपुरी पालिकेने सर्व थकीत मालमत्ताधारकांना कलम १५२ अंतर्गत अधिपत्र देऊन पाच दिवसांचा अवधी दिला होता. मात्र अधिपत्र देऊनही काही मालमत्ताधारकांनी कराचा भरणा केला तर काहीनी केला नाही. ज्यांनी कराचा भरणा ककेला नाही, अशांवर विद्युत अभियंता सचिन गाढवे नेतृत्वात जप्ती पथक तयार करण्यात आले. त्यानुसार सोमवार व मंगळवारी मुख्याधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सात दुकानांना सील ठोकण्यात आल्याने शहरात खळबळ उडाली. हे पथक हळूहळू सगळ्या थकीत मालमत्ताधारकांवर जप्तीची कार्यवाही करणार आहे. एखाद्या मालमत्ताधारकांने लावलेली सील तोडल्यास त्याच्यावर फौजदारी गुन्हा होण्याची शक्यता असल्याने नियम हातात घेण्यास कुणीही धजावत नसल्याने अनेकांनी थकीत कर भरण्यासाठी अनुकूलता दर्शविली आहे. (तालुका प्रतिनिधी)
मुख्याधिकाऱ्यांनी ठोकले सात दुकानांना सील
By admin | Updated: March 30, 2016 01:22 IST