तस्करीसाठी नवी शक्कल : रामनगर पोलिसांनी केली कारवाईचंद्रपूर: दारूबंदीनंतर अवैध दारू विक्रेत्यांकडून दारूच्या तस्करीसाठी नवनवे फंडे वापरले जात आहेत. एका भाजी विक्रेत्याच्या डाल्यात तब्बल सातपेट्या दारू आढळून आल्यानंतर पोलीसदेखील चक्रावून गेले आहेत. मंगळवारी दुपारी रामनगर पोलीस ठाण्याच्या डी.बी.पथकाने स्थानिक फुकटनगर भागात या अनोख्या दारू तस्कराच्या मुसक्या आवळल्या.हंसराज घोगरे असे दारू विक्रेत्याचे नाव असून तो वणी (जि. यवतमाळ) येथील रहिवासी आहे. तो गेल्या काही दिवसांपासून वणी येथून येथे येऊन भाजी विक्रीच्या नावाखाली देशी दारूची विक्री करीत असे. भाजीच्या डाल्यात खालच्या बाजुने दारूच्या बॉटल आणि त्यावर विविध प्रकारच्या भाज्या ठेवून त्याआड तो चंद्रपुरात दारू विक्री करीत होता. त्याने चंद्रपुरात फिरून ठरावीक ग्राहक तयार केले होते. त्याच ग्राहकांना तो नियमितपणे दारूचा पुरवठा करीत होता. दरम्यान, मंगळवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास रामनगर पोलिसांना याबाबत खबऱ्याकडून टीप मिळाली. हा दारू विक्रेता स्थानिक फुकटनगर भागात दारूची विक्री करीत असल्याची माहितीही यावेळी खबऱ्याकडून मिळाली. त्याआधारे पोलीस निरीक्षक संपत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली डी.बी. पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बारसे, पोलीस उपनिरीक्षक भाकरे, जमादार श्याम बारसागडे, नितीन दुबे, जमीर शेख, राकेश निमगडे, किरण वाडीकर यांचा समावेश असलेल्या पथकाने तातडीने फुकटनगर भागात जाऊन हंसराज घोगरे याला अटक केली. या कारवाईत अवैध दारूसह मोटारसायकल जप्त केली. (प्रतिनिधी)
भाजीपाल्याच्या डाल्यात सात पेट्या दारू
By admin | Updated: January 13, 2016 00:55 IST