केंद्रीय मार्ग निधीतून मंजुरी : सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांचे फलितचंद्रपूर : पोंभुर्णा व गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी या दोन तालुक्यांना जोडणाऱ्या घाटकुळ-मुधोली-येनापूर रस्त्यावरील वैनगंगा नदीवर उंच पातळीच्या मोठ्या पुलाच्या बांधकामाला केंद्रीय मार्ग निधीतून मंजुरी मिळाली आहे. राज्याचे वित्त व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्याला यश प्राप्त झाले आहे. ४४ कोटी ८१ लक्ष ७० हजार ६६३ रुपये खर्चून या पुलाची उभारणी करण्यात येणार असून यामुळे पोंभुर्णा आणि चामोर्शी या दोन्ही तालुक्यातील दळणवळणासाठी हा मार्ग सुकर होणार आहे. सदर पुलाच्या बांधकामाला केंद्रीय मार्ग निधीतून मंजुरी मिळावी, यासाठी ना. मुनगंटीवार यांनी गेल्या वर्षभरापासून सातत्याने केंद्र सरकारशी पत्रव्यवहार व पाठपुरावा केला. वैनगंगा नदीलगत बरीच गावे वसलेली आहेत. या नदीमुळे दोन्ही जिल्ह्यातील गावातील वाहतूक जवळपास आठ ते नऊ महिने बंद असते. हा रस्ता प्रमुख जिल्हा मार्ग असून गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी व चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभुर्णा तालुक्याला जोडतो. हे दोन्ही तालुके प्रशासकीयदृष्ट्या महत्त्वाचे असून बाजारपेठ, दवाखाना या सोयींसह दळणवळणाच्या दृष्टीने महत्वाचे गणले जातात. सदर पुलाच्या बांधकामामुळे हे दोन्ही तालुके बारमाही रस्त्याने जोडले जाणार आहेत. चंद्रपूर व बल्लारपूर व गोंडपिपरी व अहेरी रस्त्यावर आष्टी येथे बुडीत पातळीचा मोठा पुल असून पावसाळ्यात यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो.या पुलाला पर्यायी मार्ग म्हणूनही या उंच पातळीच्या मोठ्या पुलाचा उपयोग होणार आहे. मध्यंतरी झालेल्या दुर्घटनेत काही लोकांचा बुडून मृत्यू झाला होता. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर या मोठया पूलाच्या बांधकामाला मिळालेली मंजूरी महत्वपूर्ण मानली जात आहे.घाटकुळ- मुधोली- येनापूर रस्त्यावर वैनगंगा नदीवर उंच पातळीच्या मोठया पुलाच्या बांधकामाला मंजुरी मिळाल्याबद्दल भाजपाचे पोंभुर्णा तालुकाध्यक्ष तथा पोंभुणार्चे नगराध्यक्ष गजानन गोरंटीवार, पोभुर्णा पंचायत समितीचे सभापती बापूजी चिंचोलकर, जिल्हा परिषद सदस्या अल्का आत्राम, माजी जि.प. अध्यक्ष संतोष कुंभरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राहुल संतोषवार, नंदू तुम्मुलवार, ईश्वर नैताम, अजित मंगळगिरीवार, बंडू बुरांडे, अजय लोणारे, बाबूराव वडस्कर, मारोती देशमुख, ओमदेव पाल, महेश रणदिवे, ऋषी कोटरंगे, राजु बुरांडे, रवी वाढई, विलास सातपुते, प्रविण चिचघरे आदिंनी केंद्रीय भुपृष्ठ परिवहन मंत्री नितिन गडकरी, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, खा. अशोक नेते, आ. देवराव होळी यांचे आभार मानले आहे. (शहर प्रतिनिधी)
दळणवळणासाठी सुकर ठरणार वैनगंगा नदीवरील सेतू
By admin | Updated: March 20, 2016 00:53 IST