सुधीर मुनगंटीवार : पोंभुर्णा येथे बुथ कार्यकर्ता संमेलनचंद्रपूर : तळागाळातील सामान्य गरीब व्यक्तीला विकासाचा केंद्रबिंदू माणून मी राजकीय क्षेत्रात कार्यरत आहे. विकासकामांसह सेवाभावी उपक्रम राबवत भाजपाच्या माध्यमातून समाजकारण करण्याचा प्रयत्न मी सातत्याने केला आहे. बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील नागरिकांच्या प्रेमाच्या बळावर तसेच भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या प्रेमाच्या बळावर मी भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपद भुषवू शकलो. पोंभूर्णा तालुक्यात अनेक विकासाची कामे मी पूर्णत्वास आणली, अनेक सामाजिक उपक्रम राबविले. गरीब जनतेची सेवा मी ईश्वरीय कार्य समजून आजवर केले व सदैव करेल, असे प्रतिपादन बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील भाजपा- रिपाई(आ)- मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी केले. पोंभूर्णा येथे गुरुवारी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात आयोजित बुथ कार्यकर्ता संमेलनात सुधीर मुनगंटीवार बाोलत होते. पोंभूर्णा तालुक्यात फिरते वाचनालय उपलब्ध करत श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालयाचे बांधकाम आम्ही मंजूर केले. उपकोषागार कार्यालय, ग्रामीण रुग्णालय मंजूर करविले. दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत विकास कामांसाठी ५२ लाख रुपयांचा निधी मंजूर करविला. जिल्ह्याच्या विकासासाठी प्राप्त होणाऱ्या निधीतून पोंभूर्णा तालुक्यासाठी ६० लाख रु. निधी आम्ही मंजूर करविला. यासह आमदार निधीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकासकामे या तालुक्यात पुर्णत्वास आणली. या आदिवासीबहुल व नक्षलग्रस्त तालुक्याच्या औद्योगिक विकासाच्या दृष्टीने एम.आय.डी.सी. स्थापन करण्याची कारवाई अंतिम टप्प्यात आहे. पोंभूर्णा तालुक्याच्या सर्वांगिण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगत राज्यात १५ वर्षांपासून सत्तेत असलेल्या भ्रष्ट काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला महाराष्ट्रातून हद्दपार करण्याचे आवाहन सुधीर मुनगंटीवार यांनी केले.या बुथ कार्यकर्ता संमेलनाच्या मंचावर भााजपा नेते प्रमोद कडू, जि.प. अध्यक्षा संध्या गुरुनुले, जि.प. सदस्या अल्का आत्राम, पंचायत समितीचे सभापती बापू चिंचोलकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राहुल संतोषवार, पोंभूर्णा तालुका भाजपाचे अध्यक्ष गजानन गोरंटीवार, पंचायत समिती सदस्य महेश रणदिवे, भारती कन्नाके, जि.प. सदस्य तथा भाजयुमो जिल्हाध्यक्ष ब्रिजभूषण पाझारे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी बोलताना बोलताना भाजपा नेते प्रमोद कडू यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टिका केली. सिंचन घोटाळ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तर आदर्श घोटाळ्यामध्ये काँग्रेसचे नेते अडकले आहेत. या दोन्ही भ्रष्ट पक्षांनी केवळ सत्तेतच भाागीदारी केली नाही तर भ्रष्टाचारात सुद्धा भागिदारी करत महाराष्ट्राला लुटले आहे. या लुटारु व भ्रष्ट पक्षांना त्यांची योग्य जागा दाखवावी असे आवाहन प्रमोद कडू यांनी केले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरुनुले, अलका आत्राम यांचेही भाषण झाले. बुथ कार्यकर्ता संमेलनाचे संचालन दिलीप मेकलवार यांनी केले. या संमेलनात विजयाचा संकल्प हात उंच करुन कार्यकर्त्यांनी केला. संमेलनाला पोंभूर्णा तालुक्यातील भाजपा पदाधिकारी व बुथ कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी)
गरीब जनतेची सेवा ईश्वरीय कार्य समजून करेन
By admin | Updated: October 4, 2014 23:24 IST