परिपत्रक दुर्लक्षित : ज्येष्ठ नागरिक सुविधेपासून वंचितसिंदेवाही : आईवडील कष्ट करून आपल्या मुलांना शिकवितात. मुलांचे शिक्षण झाल्यानंतर ते चांगल्या नोकरीवर लागतात. आईवडील त्यांचे लग्न करून देतात. त्यानंतर काही मुलांना आई-वडिलाचा विसर पडतो. मुले त्यांना योग्यरित्या वागणूक देत नाहीत. त्यामुळे त्यांना हालअपेष्टा सहन कराव्या लागतात. काही मुले नोकरीवर लागल्यानंतर आई-वडिलांचा सांभाळ करीत नाहीत. घरातून हाकलून लावतात. त्यामुळे काही जणांना वृद्धाश्रमात राहावे लागते. सद्यस्थितीत अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तरीही शासन ज्येष्ठ नागरिकांप्रति गंभीर नसल्याचे दिसून येत आहे.कौटुंबिक अन्यायापासून ज्येष्ठ नागरिकांचे संरक्षण व्हावे, ज्येष्ठांसाठी कार्यरत संस्था व संघटनेकडून मदत मिळावी, त्यांच्या प्रति सहानुभूती वाढावी, या दृष्टीने ज्येष्ठ नागरिकांचा प्रश्न ग्रामसभेत ठेवावा, असे परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व जलसंधारण विभागाने जून २०१४ मध्ये काढले होते. ६५ वर्षावरील नागरिकांसाठी समूपदेशन केंद्र, नियमित आरोग्य तपासणी, वैयक्तिक जीवनातील ताणतणावाला तोंड देता यावे, गृहनिर्माण योजनेत गरजेनुसार सुविधा आदी बाबीची तरतूद केली जावी, असे या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. गावात ग्रामपंचायत सरपंच आणि सचिवांनी समस्याग्रस्त जेष्ठाचे सर्व्हेक्षण करून त्यांची यादी तयार करावी व ग्रामसभेत मांडावी, अशा सूचना करण्यात आल्या. मात्र कुठल्याही ग्रामपंचायतीने याची अंमलबजावणी केलेली नाही. विशेष म्हणजे, सिंदेवाही तालुक्यातील ग्रामपंचातींना असे काही परिपत्रक आहे, याचीही माहिती नाही. अशा प्रकारचे काही परिपत्रक आहे, याबाबतची माहिती पंचायत समिती अधिकाऱ्यांनाही नाही. सिंदेवाही येथे सार्वजनिक बगिचा नाही. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक व सेवानिवृत्त शिक्षक एस.टी. बसस्थानकासमोरील ओट्यावर बसतात. नवीन बसस्थानक ते जुन्या बसस्थानकापर्यंत एकही प्रसाधनगृह नाही. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय होत आहे. ज्येष्ठ नागरिकांना शासकीय ग्रामीण रुग्णालयात आरोग्य विषयक सुविधा मिळत नाहीत. ज्येष्ठ नागरिकांना सामान्य रुग्णालय, एसटी बस व रेल्वे प्रवासात सुविधा पुरविण्यात याव्या, अशी ज्येष्ठ नागरिकांची मागणी आहे. (पालक प्रतिनिधी)ग्रामविकास व जलसंधारण विभागाच्या जून २०१४ मधील आदेशाची अंमलबजावणी करण्याकरिता ज्येष्ठ नागरिक संघाकडून प्रयत्न करण्यात येईल.- अशोक साळवे,अध्यक्ष, ज्येष्ठ नागरिक संघ, सिंदेवाही
ज्येष्ठ नागरिकांकडे शासनाचे दुर्लक्ष
By admin | Updated: November 6, 2016 00:53 IST