पोलिसात तक्रार : आई व मुलाची बनावट स्वाक्षरीराजुरा : राजुरा शहरात आदिवासीच्या जमिनी हडपण्याचा गोरखधंदा मोठ्या प्रमाणात सुरु आहे. सर्वे क्रमांक १४९/२१ मध्ये ६६ आर जमीन आई आणि मुलाच्या खोट्या स्वाक्षऱ्या करून जमीन हडपल्याची तक्रार राजुरा येथील चंद्रप्रकाश गंगाराम मेश्राम यांनी राजुरा पोलीस ठाण्यात केल्याने हा धक्कादायक व गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. १५ दिवस लोटूनही राजुराचे ठाणेदार यांनी कोणतीच कारवाई केली नाही, याबाबत मात्र आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. राजुरा येथील रजिस्ट्रर आॅफीसमध्ये सदर जमिनीचे विक्रीपत्र झाले असून खरेदी करणाऱ्याचे नाव संभा कोवे आहे. तर माधव मेश्राम चंद्रप्रकाश मेश्राम, पंचफुला मेश्राम, शंकुतला मेश्राम असे चार व्यक्तीनी जमीन विक्री केल्याचे रजिस्ट्रीमध्ये नमूद आहे. परंतु शंकुतलाबाई मेश्राम आणि चंद्रप्रकाश मेश्राम यांनी स्वाक्षरीच केली नसल्याचे म्हटले आहे. चंद्रप्रकाश मेश्राम हा इंग्रजीमध्ये स्वाक्षरी करतो. मात्र त्याची स्वाक्षरी या विक्रीपत्रात मराठीत केली आहे. शकुंतलाबाई मेश्राम यांच्या अंगठ्याच्या ठसामध्येही तफावत आढळून येत आहे. त्यामुळे स्वाक्षरी व अंगठ्याचा ठसा बनावट असून दस्तावेजच खोटे तयार करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, विक्री करणाऱ्या व्यक्तींना ओळखतो म्हणून राजुराच्या एका माजी नगरसेवकाने विक्रीपत्रात स्वाक्षरी केली आहे. हा नगरसेवक जमिनीची विक्री करताना रजिस्ट्रीच्या वेळी उपस्थित नसतानासुद्धा उपस्थितांना ओळखतो म्हणून रजिस्ट्रारची दिशाभूल केली आहे. वरील जमीन भोगवटदार दोन असताना एकमध्ये रुपांतरित करुन विक्रीकरिता तत्कालीन उपविभागीय अधिकारी राजुरा यांच्या १४ मार्च २००१ ची परवानगी मागितली असता हा आदेश कार्यालयातून गहाळ झाल्याचे म्हटले जात आहे. जो आदिवासी खरेदीदार आह,े त्या संभा कोवे यांना त्याच्या नावाने जमीन खरेदी केल्याचे माहित नसल्याचा आरोप चंद्रप्रकाश मेश्राम यांनी तक्रारी द्वारे केला आहे. स्वाक्षऱ्या व अंगठे खोटे असल्याचेसुद्धा म्हटले आहे. राजुरा तालुक्यात आदिवासी जमिनीचा मोठा घोटाळा झाला असून अनेक आदिवासी भूमिहीन झाले आहे. राजुरा येथील चंद्रप्रकाश गंगाराम मेश्राम यांनी सदर व्यवहारात माझी फसवणूक झाली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. उल्लेखनीय असे की सध्या या जमिनीची किमत तीन कोटी रुपये आहे. मात्र अवघ्या एका लाखात खोटी रजिस्ट्री करुन या जमिनीचे विक्रीपत्र तयार करण्यात आले आहे. त्यामुळे एका आदिवासीला भूमिहीन तर केलेच आदिवासींची फसवणूक केली आहे. या सर्व प्रकरणाची सविस्तर चौकशी करुन दोषी व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी आदिवासी शेतकरी चंद्रप्रकाश मेश्राम यांनी पोलीस तक्रारीतून केली आहे. (शहर प्रतिनिधी)
तीन कोटींची जमीन एका लाखात विक्री
By admin | Updated: July 6, 2014 23:49 IST