नवरगाव परिसरात रोवणीच्या कामांना सुरुवात
नवरगाव : नवरगाव परिसरातील शेतकरी धानाचे उत्पादन घेत असला, तरी या वर्षी विविध रोगाचे आक्रमण झाल्याने तो मेटाकुटीला आला. असे असताना स्वतःला सावरत पुन्हा उन्हाळी धानाची पीक घेण्याच्या दृष्टीने जिद्दीने कामाला लागल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे.
सिन्देवाही तालुका धानपिकासाठी प्रसिद्ध असून, सर्वत्र धानाचे मुख्य पीक घेतल्या जाते. मात्र, या वर्षी॔ चांगले पीक येणार अशी शेतकऱ्यांची अपेक्षा असताना, धानपिकावर मावा-तुडतुडा आणि इतर रोगांचे आक्रमण झाले आणि हातात येणारे धानपीक शेतकऱ्यांच्या डोळ्यांसमोर उद्ध्वस्त झाले. या एका पिकांवर शेतकऱ्यांचा वर्षाचा बजेट असताना तो पूर्ण कोलमडला.
यातील काही शेतकरी स्वतःला सावरत पुन्हा उन्हाळी धानाची फसल घेण्याच्या कामाला लागले असून, काही शेतकऱ्यांनी नुकतेच धान पऱ्हे टाकले, तर काही शेतकऱ्यांनी रोवणीच्या कामाला सुरुवात केल्याचे चित्र आहे. यामुळे मजुरांच्या हाताला काम मिळाल्याने समाधानाचे वातावरण आहे.
काही शेतकरी धानाचे रोपे परे टाकून रोवणीच्या प्रतीक्षेत तर काहींनी रोवणी सुरू केली आहे.