चालकांची मनमानी : गावकरी संतप्त कान्हाळगाव: शाळकरी पासधारक विद्यार्थी बसमध्ये बसण्यासाठी गेले असता त्यांना बसमध्ये बसण्यासाठी मज्जाव करुन चालकाने खाली उतरविले. हा संतापजनक प्रकार सोमवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास गडचांदूर बसस्थानकांवर घडला. त्यामुळे विद्यार्थी व पालकांनी रोष व्यक्त केला. विद्यार्थ्यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, गडचांदूर येथील बसस्थानकावर दुपारी १२ वाजता चंद्रपूर- आदिलाबाद बसचे आगमण झाले. बस आल्याबरोबर पासधारक विद्यार्थी बसमध्ये चढायला लागले. तेव्हा चालकांनी विद्यार्थ्यांना बसमध्ये चढण्यास मज्जाव केला. आधी प्रवाशांना बसू द्या. नंतर तुम्ही बसा, असे चालक म्हणाला. त्यातच इतर प्रवाशांमुळे बस खचाखच भरली. परिणामी विद्यार्थ्यांना बसस्थानकावर ताटकळत उभे राहावे लागले. त्यानंतर लगेचच राजुरा- कोरपना मिनी बस आली. तेथील चालक व वाहकांनी मिनी बसमध्ये पास चालत नाही, असे सांगून विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा बसण्यापासून रोखले. शाळकरी मुले बसमध्ये दोन-तीन वेळा चढले आणि उतरले. शेवटी इतर प्रवासी आल्यास विद्यार्थ्यांना उभे राहून प्रवास करावा लगेल, या अटीवर बसमध्ये बसविण्याची परवानगी देण्यात आली. असाच प्रकार विद्यार्थ्यासोबतच अनेकदा घडतो आहे. या अनुषंगाने राज्य परिवहन विभागाने चालक- वाहकांना विद्यार्थ्यांप्रती माणूसकीची वागणूक देण्याची समज द्यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे. गडचांदूर ते कोरपनादरम्यान ५० ते ६० पेक्षा अधिक विद्यार्थी दररोज प्रवास करतात. इंजापूर, धामणगाव, वडगाव, आसन, खिर्डी, कढोली, रामपूर, वनसडी, सोनुर्ली, चिंचोली, लोणी, कोरपना, माथा, पारडी, परमोडा, कन्हाळगाव, अकोला, जेवर, पिपरी गावातील विद्यार्थी नियमित शाळेत जातात. परंतु पास असूनही विद्यार्थ्यांना बसमध्ये बसण्यापासून रोखले जाते. तेव्हा या पासचा उपयोग काय? असा सवाल संतप्त विद्यार्थ्यांनी केला. (वार्ताहर) घडलेल्या प्रकाराबाबत राजुरा आगर व्यवस्थापकांशी संपर्क साधला असता, त्यांनी राजुरा बसस्थानकांवर संपर्क करण्यास सांगितले. त्यानंतर राजुरा बसस्थानक नियंत्रकांनी चंद्रपूर बसस्थानकावर संपर्क करण्यास सांगितले. त्यांनी थेट तक्रार करण्याचाही सल्ला दिला. मात्र याबाबत कुणीही गंभीर दखल घेतली नाही. अतिरिक्त बसफेरी सोडा दुपारी १२ वाजताची वेळ शाळा सुटण्याची असते. त्यामुळे विद्यार्थी व इतर प्रवाशांची एकच गर्दी होते. पासधारक विद्यार्थ्यांसाठी गडचांदूर ते कोरपना अतिरिक्त बसफेरी सुरु करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.आम्ही दररोज ५० ते ६० पासधारक विद्यार्थी गडचांदूर ते कोरपनादरम्यान शाळेत जाण्या-येण्यासाठी एसटी बसने प्रवास करतो. त्यामध्ये बहुसंख्य मुली आहेत. परंतु अनेकदा आम्हाला बसमध्ये बसूच दिले जात नाही.त्यामुळे पास असुनसूद्धा फूकट जात असल्यासारखी वागणूक चालक वाहकांकडून दिली जाते. आमच्यातील काही विद्यार्थी वयाने लहान आहेत. त्यामुळे ते घाबरलेले असतात. याबाबत वाहतूक नियंत्रकाकडे तक्रार केली, तरी त्याकडे ते नेहमीच दुर्लक्ष करतात. - विवेक पारखी, विद्यार्थी
शाळकरी विद्यार्थ्यांना एसटीतून उतरविले
By admin | Updated: August 3, 2016 01:51 IST