‘लोकमत’ने दिली संधी : संस्काराचे मोती-२०१५ ची ठरली विजेतीब्रह्मपुरी: येथून जवळच असलेल्या उदापूर गावातील सुधीर राऊत यांची मुलगी संध्या ही नेवजाबाई हितकारिणी कन्या विद्यालयात आठवीमध्ये शिकत आहे. एक-दीड एकर शेती व कुटुंब मोठे असल्याने वडील भाजीपाला व्यवसाय करुन मुलांना शिकवितात. लोकमतच्या संस्काराचे मोती -२०१५ मध्ये संध्याने चंद्रपूर जिल्ह्यातून हवाई सफरचा मान पटकाविल्याने तिचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. ‘लोकमत’द्वारा संस्काराचे मोती- २०१५ मध्ये स्पर्धा आयोजित केली होती. यात ब्रह्मपुरी येथील नेवजाबाई हितकारिणी विद्यालयात आठवीत शिकणारी संध्या राऊत ही सहभागी झाली. घरी वर्तमानपत्र येत नाही, तरीही या विद्यार्थीनीने बाजूच्या किराणा दुकानातून पेपरचे कात्रण मागून १०० पैकी १०० कूपन गोळा केलेत व जिल्ह्यातून हवाई सफरची मानकरी ठरली. लोकमत समूहाच्या माध्यमातून येत्या २४ जूनला नागपूर- दिल्ली- नागपूर आणि परत असा तिचा प्रवास होणार आहे. एका होतकरू विद्यार्थीनीने मिळविलेले हे यश ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे आहे. शहरी विद्यार्थी वर्तमानपत्र व इतर माध्यमांनी परीपूर्ण असतात. मात्र ग्रामीण विद्यार्थ्यांना अशा सोयी अपूर्ण असूनही हे यश संपादन केल्याने संध्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. यासाठी संस्थेचे सचिव अशोक भैय्या, मुख्याध्यापिका प्रभा मैद व संस्कार मोतीचे समन्वयक शिक्षक राजू हटवार आणि संपूर्ण शिक्षकवृंद तसेच आई, बहिणी व कुटुंबीयांचे सहकार्य लाभल्याचे मत संध्याने ‘लोकमत’ शी बोलताना व्यक्त केले आहे. (तालुका प्रतिनिधी)
ब्रह्मपुरीच्या संध्या राऊतला मिळाला दिल्ली हवाई सफरचा मान
By admin | Updated: June 24, 2016 01:32 IST