बल्लारपूर : प्रत्येक तीन वर्षाच्या अंतराने होणारी वेतनश्रेणी आणि पगारवाढ याबाबत बल्लारपूर पेपरमील मजदूर सभा आणि पेपर मील व्यवस्थापन यांच्यात चर्चा होऊन पेपर मीलच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात १८६५ ते ४१८८ अशी महिन्याकाठी म्हणजेच सरासरी ३१२८ रुपयांनी वाढ झाली आहे. ही वाढ १ जुलै २०१४ पासून लागू होत आहे. व्यवस्थापन आपल्या कर्मचाऱ्यांना १२ महिन्यांची थकबाकी देईल. माजी खासदार नरेश पुगलिया हे अध्यक्ष असलेल्या मान्यताप्राप्त बल्लारपूर पेपर मील मजदूर सभेच्या वतीने होणारी ही त्रीवर्षीय (ग्रेडेशन) ११ वी पगार वाढ आहे, अशी माहिती बल्लारपूर पेपर मिल मजदूर सभेचे महासचिव वसंत मांढरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.पेपर मीलच्या नियमित कर्मचाऱ्यांच्या मुळ वेतनात ७३३ रुपये वाढ झाली असून या व्यतीरिक्त वेतनश्रेणीनुसार नियमित वाढ (इंक्रीमेट) सरासरी १११.३० रुपये, फिटनेट ५५ रुपये ३७ रुपये, उत्पादकता (प्रॉडक्शन) बोनस, सुपर बोनस, भविष्य निर्वाह निधी, उपदान अशी अप्रत्यक्ष आणि प्रत्यक्ष धरून ही वाढ सरासरी ३१२८ रुपये होते. यासोबतच, ठेकेदारी आणि रोजंदारी (डेलीपेड) यांच्या वेतनात प्रतिदिन २९ रुपये आणि सफाई कामगारांच्या वेतनात २७ रुपयांनी वाढ झाली आहे. बीएससी आणि आयटीआय असलेल्या कामगारांच्या वेतनात तसेच शिकाऊ उमेदवार (अप्रेंटीस) यांच्या वेतनातही वाढ करण्यात आलेली आहे. आर्थिक दर्जा उंचावण्यासोबतच शैक्षणिक क्षेत्राकडेही या करारात विचार करण्यात आलेला आहे. ठेकेदारी कर्मचाऱ्यांच्या आठवीपासून पुढे ७५ टक्क्याहून अधिक गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दरमहा ५०० रुपये शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. स्थायी कामगारांना ग्रूप मेडीक्लेम लागू होईल, असेही या करारात म्हटले आहे. याबाबत ठेकेदारी कामगारांबाबतही विचार केला जात आहे, अशी माहिती पगारवाढीची माहिती देताना महासचिव वसंत मांढरे यांनी पत्रकारांना दिली. वेतनवाढीची चर्चा बल्लारपूर पेपर मिल मजदूर सभेचे अध्यक्ष नरेश पुगलिया, महासचिव वसंत मांढरे, कार्याध्यक्ष तारासिंग कलशी, सहसचिव एन. सत्यनारायण, छोटेलाल, संगठन सचिव चौधरी व रामदास वागदरकर, हेमंत दातारकर, अनिल तुंगीडवार, प्रभाकर टोंगे, जयंत नंदूरकर, विरेंद्र आर्य, गजानन दिवसे तर कंपनीचे सीओओ अग्रवार, एचआर व्हीपीएस मोहन, कंपनी युनिट प्रमुख एस.एस. अरोरा, आनंद बर्वे, रमेश यादव, दुष्यंतकुमार यांच्यामध्ये होऊन तसा करार करण्यात आला. (तालुका प्रतिनिधी)
बल्लारपूर पेपरमिलमध्ये वेतनवाढ
By admin | Updated: July 2, 2015 01:34 IST