गोंडपिपरी : गोंडपिपरी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या आक्सापूर ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी पृथ्वीराज खोब्रागडे यांचा अपघातात गुरूवारी सायंकाळी मृत्यू झाला. काही कामानिमित्त कारने ते तेलंगनात गेले होते. गोंडपिपरीकडे परत येताना त्यांना फोन आला. फोन उचलताना वाहनावरील ताबा सुटल्याने आयटेन या नव्याकोऱ्या कारची झाडाला जोरदार धडक बसली. या अपघातात पृथ्वीराज खोब्रागडे घटनास्थळीच ठार झाले, तर त्यांच्या सोबतच्या दोन मुली गंभीर जखमी झाल्यात. ही घटना धाबा-गोंडपिपरी मार्गावरील वडराना नजिक जंगलात गुरुवारी रात्री ७ वाजताच्या सुमारास घडली.अश्विनी ताराचंद धाडसे (२२) रा. खांबाडा व त्रिवेणी सुधाकर सोयाम (२३) गोंडपिपरी अशी जखमी मुलींची नावे असून त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ग्रामविकास अधिकारी खोब्रागडे यांनी दोन महिन्यांपूर्वीच कार घेतली होती. या कारला क्रमांकही मिळाला नव्हता. कारची धडक एवढी जबरदस्त होती की, इंजिीनसह स्टेरिंग खोब्रागडे यांच्या छातीवर आदळले. त्यामुळे गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. मृतदेह बाहेर काढताना अक्षरश: स्टेरिंगला तोडावे लागले. (शहर प्रतिनिधी)
कार अपघातात ग्रामविकास अधिकारी ठार
By admin | Updated: April 16, 2016 00:37 IST