वरोरा : वरोरा शहरातून साहित्य घेवून वणीकडे निघालेल्या एका ट्रकला अचानक आग लागली. या आगीत ट्रकमधील जवळपास दोन लाख रुपयांचे साहित्य जळून खाक झाले. ही दुर्घटना शनिवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली. ट्रक चालकाने आग लागल्याचे लक्षात येताच, रस्त्याच्या कडेला उभा करून ट्रक थांबविला. नागरिकांनी धाव घेऊन मिळेल, त्या भांड्याने पाणी आणून आग विझविण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, जी.एम.आर. एम्कोचे अग्नीशामक दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर आग आटोक्यात आली. घटनास्थळापासून हाकेच्या अंतरावर नगरपालिकेचे कार्यालय होते. परंतु पालिकेचे अग्निशमन दल वेळेवर पोहचू न शकल्याने या अग्नीशमन दलाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.दुपारी १ वाजताच्या सुमारास वरोरा शहरातील उपजिल्हा रुग्णालयासमोर असलेल्या महालक्ष्मी गॅरेजमध्ये एमएच ३१-डीएस २०९३ हा ट्रक नागपूर येथून साहित्य घेवून दाखल झाला. काही साहित्य गॅरेजमध्ये उतरविल्यानंतर तो वणीकडे निघाला. दरम्यान, उपजिल्हा रुग्णालयाजवळ या ट्रकला अचानक आग लागली. ही बाब चालकाच्या लक्षात येताच, त्याने ट्रक रस्त्याच्या कडेला उभा केला. त्याने आरडाओरड केल्याने परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेऊन आग विझविण्याचे प्रयत्न सुरू केले. काही नागरिकांनी या घटनेबाबत पोलिसांना सुचना दिली. याचवेळी जीएमआरच्या अग्नीशमन दलाने घटनास्थळी तात्काळ पोहचून आगीवर नियंत्रण मिळविले. जीएमआर अग्निशामक दलाचे मंगेश बुरडकर, मोहसिन हम्पी, राहूल आगलावे व सचिन कोल्हे यांनी आग नियंत्रणात आणली. आगीचे कारण मात्र कळू शकले नाही. (तालुका प्रतिनिधी)
वरोऱ्यात धावत्या ट्रकला आग
By admin | Updated: March 22, 2015 00:07 IST