काव्यमैफिल रंगली : आर्या दी बेस्टचा उपक्रमचंद्रपूर : आर्या दी बेस्ट अकादमी पाटणच्या वतीने जिवतीसारख्या अतीदुर्गम भागात चंद्रपुरातील प्रतिभावंत कवींची बहारदार काव्यमैफिल पार पडली. आश्रमशाळा पाटण येथे झालेल्या या काव्यमैफिलीची सुरुवात मधुकर गराटे यांया बोलीभाषेतील लयदार रचनेने झाली. तर आभाळाची आमची पोर, पंख त्यांना द्या ना सर.. उंच भरारी घेतील ज्याने, अशा दिशेला न्या ना सर.. ’ या गीता रायपूरेच्या रचनेने वन्स मोअर मिळविला.‘मी मुलीचा बाप आहे... काय रे हा शाप आहे? काळजाचे फूल माझ्या, ऐन वेळी राप आहे’ ही गझलकार रोशन कुमार पिलेवान यांची चिंतनशील रचना रसिकांना अंतर्मुख करुन गेली.‘कुठे गेले हंगामाच्या सुगीचे दिवस, राबणाऱ्या माणसाला पडला उपसा...’ असे म्हणत कवी किशोर कवठे यांनी शेतकऱ्याचे वास्तव जीवन उभे केले. रामकृष्ण रोगे यांची गझल, ‘खाटेत पाहिले अन् सांदे फरार झाले, मेल्यावरी रडाया सारे तयार झाले...’अशा प्रकारे आजच्या स्वार्थी समाज जीवनाचे चित्रण केले. मो. बा. देशपांडे यांनी.. ’भल्या पहाटे उठल्या गुटख्याची वाट धरतो... पानमंदिरी फूकट उगा वेळेची कत्तल करतो...’ असा रसिकांना व्यसनमुक्तीचा सल्ला दिला.प्रभाकर धोपटे यांची ‘नवरा बापाने पाहून दिला देखना, निंगला गॉगलच्या आत मंदी हेकना’ ही विनोदी रचना रसिकांमध्ये हास्याचे कारंजे उडवित लोटपोट करणारी ठरली.‘लपेटले धुक्यातले हे चंद्रथेंब मोकळे , सांगू कसे प्रिया तुला हे शब्दरंग बिलगले...’ वर्षा चोबे यांनी ही प्रेमकविता तेवढ्याच नजाकतीने सादर केली.कवी किशोर मुगल यांनी वऱ्हाडी शैलीत प्रेमकविता सादर करीत काव्यमैफिलीत एक हास्यकल्लोळ माजविला. प्रा. डॉ. पद्मरेखा धनकर यांनी अध्यक्षीय काव्यातून ‘पहिल्यांदा बुलडोझर चालला देहावर, देठ उगवण्याच्या काळात... कोवळ्या पालवीचा चेंदामेंदा सरकार कोणास सांगायचे दु:ख...’ ही रचना सादर करुन वेश्या व्यवसायातील विदार दु:ख मांडल आणि रसिकांना धिरगंभीर केले. काव्यमैफिलीचे बहारदार संचालन करणारे कवी नरेशकुमार बोरीकर यांनी ‘दिवस पावसाचे चिंब चिंब भिजायाचे... ओल्या मातीच्या कुशीत बिजाने रुजायाचे...’ बेकारीच्या वाळवंटात भटकणाऱ्या युवकांमध्ये आशावाद निर्माण करणारी रचना सादर केली अन् रसिकांच्या मनाचा ठाव घेतला.काव्यमैफिलीला पाटणचे पोलीस निरीक्षक ठाणेदार सोनवने, सरपंच सुषमा मडावी, आश्रम शाळेचे मुख्याध्यापक विद्यार्थी प्रशिक्षणार्थी प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी बी. सी. नगराळे, बापूराव टोंगे, मधुकर कौरासे यांनीही आपल्या रचना सादर करुन रसिकांच्या मनाचा ठाव घेतला.काव्यमैफिलीच्या यशस्वीतेसाठी आर्या अकाडमीचे संचालक भिमराव पवार यांनी विशेष परिश्रम घेतले. मान्यवरांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. आभार जाधव यांनी मानले. (जिल्हा प्रतिनिधी)
रोम रोमी माझ्या काटा...!
By admin | Updated: November 5, 2016 02:18 IST