चंद्रपूर : कधी नव्हे तर या वर्षीच्या निवडणूकीत उमेदवार रिंगणात आहेत. सगळ्याच पक्षात बंडखोरी होऊन कार्यकर्ते दुभंगले आहेत. त्यामुळे जे कार्यकर्ते पक्षाकडे उरले आहेत, त्यांना सोन्याचा भाव आला आहे. मतदानासाठी अवघ्या काही दिवसांचाच कालावधी शिल्लक असून सगळेच उमेदवार, कार्यकर्ते प्रचारासाठी जिवाचे रान करीत आहेत. आपला उमेदवार इतरांपेक्षा सरस हे दाखविण्याची जणू स्पर्धाच लागली असून कार्यकर्त्यांच्या सोयीसाठी वातानुकूलीत वाहनांची मागणी वाढली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील सहा विधानसभा क्षेत्रात तब्बल १०७ उमेदवार रिंगणात आहेत. सगळ्याच उमेदवारांनी आपआपला प्रचार सुरु केला आहे. ग्रामीण भागातील मतदारांपर्यंत पोहचण्याची उमेदवारांची चढाओढ सुरु आहे. कार्यकर्ते रात्रंदिवस प्रचाराच्या कामात व्यस्त आहेत. मात्र, पावसाची हुलकावणी आणि वातावरणातील उकाड्याने सर्वानाच त्रस्त करुन सोडले आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांना प्रचार करताना उकाड्याचा सामना करावा लागत आहे. उकाड्यापासून बचाव करण्यासाठी प्रचारासाठी वातानुकूलीत वाहनांची मागणी वाढली आहे. उमेदवारही कार्यकर्त्यांचा हट्ट पुरवित असल्याने शहरातील वाताणुुकूलीत वाहनांच्या भाड्यात मोठी वाढ झाली आहे. वाहनधारकांना सुगीचे दिवस आले असून येथील वरोरा नाक्याजवळील उडाणपूलाच्या बाजुला दररोज भाडा मिळण्याच्या प्रतिक्षेत उभे राहणारे वाहन आता दिसतच नाही. प्रचारासाठी सगळे वाहन बुक झाली आहेत. सगळपासूनच हे वाहन भाड्याने जात आहेत. काही उमेदवारांना वाहन भाड्याने न मिळाल्याने मित्र, नातेवाईकांचे वाहनही आपल्या ताब्यात घेऊन प्रचाराच्या कामात लावली आहेत. वाहनांच्या भाड्याचा खर्च उमेदवाराच्या प्रचार खर्चात जोडला जाऊ नये, यासाठी कार्यकर्ते खबरदारी बाळगत असल्याचे चित्र सध्या जिल्हाभरात दिसून येत आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
प्रचारासाठी वाहनांची चणचण
By admin | Updated: October 6, 2014 23:09 IST