भेजगाव : भेजगाव परिसरामध्ये यावर्षी अपुऱ्या पावसाअभावी धान उत्पादक शेतकऱ्यांना संकटाचा सामना करावा लागत आहे. अशा स्थितीत मजुर वर्गाला रोजगार हमी योजनेच्या कामाची मोठी आशा होती. मात्र केवळ दोन आठवडेच काम करून ऐनवेळी काम ठप्प झाल्याने शेतकऱ्यांमध्ये नैराश्य आले आहे. बंद करण्यात आलेले काम तातडीने सुरू करण्याची मागणी मजुरांनी केली आहे.भेजगाव परिसरातील गावात रोहयोची कामे मागील दोन महिन्यांपासून सुरू झाली. मात्र भेजगावात रोहयोची कामे उशिरा सुरू झाल्याने मजुरांना उपासमारी टाळण्यासाठी बाहेर जिल्ह्यात स्थानांतर व्हावे लागले. मजुरांची वाढती मागणी लक्षात घेता, ग्रामपंचातीने ३ मार्चला दहेगाव येथील मामा तलावाच्या खोलिकरणाचे काम सुरू केले. या कामावर चारशे-पाचशे मजुरांनी काम केले. मजुरात उत्साहाचे वातावरण होते. मात्र कोणतेही कारण नसताना ग्रामपंचायतीने दोन आठवड्यातच काम बंद केल्याने मजुरांचा रोजगार हिरावला गेल्याने मजुरात संताप व्यक्त होत आहे.रोहयोची कामे करण्याकरिता जवळपास १६ लाख रुपये मंजुर असून दोन आठवड्यात यातील सात लाख रुपये खर्च झाल्याचे समजते. उर्वरित पैसे शिल्लक असतानाही अचानक काम बंद झाल्याने आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे.ज्या परिसरात दुष्काळसदृष्य परिस्थिती आहे. त्या गावातील जॉब कार्डधारक मजुरांना १०० दिवस काम देणे आवश्यक असतानाही स्थानिक प्रशासनाने या योजनेची अंमलबजावणी करण्यास दिरंगाई केली. त्यामुळे आता दाद कुणाकडे मागावी, असा प्रश्न मजुरांना पडला आहे. शेतमजुरांच्या हाताला ग्रामीण भागात दुसरे काम मिळत नसल्याने आर्थिक स्थिती खालावली आहे. रोहयोची कामे त्वरित सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. (वार्ताहर)
भेजगाव येथे रोहयोची कामे ठप्प
By admin | Updated: March 29, 2016 02:31 IST