सावली : शेतीचा हंगाम सुरू होताच अनेक शेतकऱ्यांची रस्त्याची समस्या निर्माण झाली आहे. यासंदर्भात तहसीलदारांकडे अर्ज येताच तहसीलदार परिक्षित पाटील यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आपसी तडजोड करून रस्त्याची समस्या निकाली काढली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतावर जाण्यासाठी कायमस्वरूपी रस्ता मिळाला आहे.
शेतातील रस्त्यासाठी अनेकदा भांडणतंटे होतात. सावली तालुक्यात शेतीचा हंगाम सुरू होताच अनेकांनी एकमेकांचे रस्ते अडविले. त्यामुळे शेतात जाण्यास अडचण निर्माण झाली होती. याबाबत सावली, निलसनी पेटगाव, जांब, सिर्सी, सिंदोळा, हिरापूर, लोढोंली येथील शेतकऱ्यांनी रस्त्यासाठी अर्ज केला होता. शेतीचा हंगाम सुरू असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी ही समस्या सोडविणे गरजेचे होते. त्यामुळे सावलीचे तहसीलदार परिक्षित पाटील यांनी संबंधित साझाचे तलाठी, मंडळ अधिकारी यांच्यासह शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आपसी तडजोड करून रस्त्याची समस्या सोडवत आहे. अनेक प्रकरणांत त्यांना यश आले आहे. तर काही प्रकरणांत कायदेशिररीत्या मार्ग काढून दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतात जाणे सोयीचे झाले आहे. शेतकऱ्यांची रस्त्याची समस्या सोडविण्यासाठी मंडळ अधिकारी निखाते, सावलीचे मंडळ अधिकारी कावळे, सावलीचे तलाठी योगेश सागुळले, हरांबाचे तलाठी झिटे प्रयत्नरत आहेत.
कोट
शेतातील रस्त्यासंदर्भात अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे पहिले मंडळ अधिकाऱ्यांना मोका चौकशीसाठी पाठविण्यात येते. जर समस्या मार्गी लागली नाही तर स्वत: जाऊन शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून आपसी तडजोड करून रस्ता तयार करून दिला जात आहे. काही ठिकाणी तात्पुरता रस्ता काढून दिला आहे. पीक निघाल्यानंतर कायमस्वरूपी रस्ता तयार करून देण्यात येणार आहे.
- परिक्षित पाटील, तहसीलदार सावली