काम निकृष्ट : पालकमंत्र्यांनी घेतली दखलचंद्रपूर : भटाळा- आसाळा व खेमजई या गावादरम्यान महिनाभरापूर्वी रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम करण्यात आले. या कामात डांबराचे प्रमाण अत्यल्प वापरल्याने रस्त्याची गिट्टी आताच निघायला सुरुवात झाली. या संदर्भात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी याची दखल घेत, रस्त्याच्या चौकशीसाठी मुंबई येथून पथक पाठविण्याचे आश्वासन दिले आहे. वरोरा तालुक्यातील भटाळा- आसाळा व खेमजई येथील गावादरम्यान अंदाजे पाच किमीचे डांबरीकरण हिंगणघाट येथील संदीप कन्स्ट्रक्शन कंपनीने केले.या रस्त्याच्या डांबरीकरण व साईडपट्ट्यांच्या पुनर्रभरणासाठी ४० ते ४५ लाखांचा निधी सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे मंजूर करण्यात आला. या रस्त्याच्या बांधकामामध्ये कंत्राटदाराने डांबरचे प्रमाण अत्यल्प वापरल्याने रस्ता महिन्याभरातच दबायला लागला असून, उखडायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे या रस्त्याच्या बांधकामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.सार्वजनिक बांधकाम विभाग वरोराचे संबंधित कनिष्ठ अभियंत्यांचेही याकडे दुर्लक्ष आहे. या संदर्भात ओरड झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग नागपूर येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या रस्त्याची सायंकाळी ७ वाजता येऊन मोबाईलच्या प्रकाशात थातूरमातूर चौकशी करुन अहवाल चौकशीसाठी नेले. यासंदर्भात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी याची दखल घेत या अधिवेशनातून हा मुद्दा उपस्थित करुन रस्त्याची चौकशी करण्यासाठी मुंबई येथून चमू पाठविण्यात येईल व यात दोषी अभियंता व संबंधित कंत्राटदारावर कायदेशिर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे. (शहर प्रतिनिधी)
रस्ता बांधकामाची चौकशी
By admin | Updated: March 20, 2017 00:39 IST