लोकमत न्यूज नेटवर्ककोरपना : तालुक्यातील वनसडी-पवनी प्रमुख जिल्हा महामार्ग क्रमांक १५ वरील नारंडा येथे तीन ठिकाणी गतिरोधक तयार करण्यात आले आहे. परंतु, या गतिरोधकाला मापदंड नसल्याने उलट अपघात होण्याची शक्यता बळावली आहे.
सदर तयार करण्यात आलेले गतिरोधक काही ठिकाणी पूर्णतः दबले गेले आहेत. त्या स्थानी वाहनातील कोळसा, रेती सांडली गेली आहे. त्यामुळे घसरण तयार झाली आहे. गतिरोधकावर रंगरंगोटी, रेडियम पट्टया तसेच सूचना फलक लावण्यात आले नाही. त्याचा फटका वाहतूकदारांना प्रवासात बसतो आहे. रात्रीच्या वेळेस हे गतिरोधक दिसून येत नाहीत.
शिवाय याच मार्गादरम्यान झुडपी जंगल असल्याने जंगली जनावरांचा वावर असतो. त्यामुळे जरा जपूनच वाहने चालवावी लागत आहेत. परंतु, नवीन व्यक्तींना नव्याने टाकण्यात आलेल्या गतिरोधक व वन्यप्राणी भ्रमण मार्गाबद्दलची माहितीच नसल्याने किरकोळ अपघात वाढले आहेत. नारंडा येथील वनसडी रस्त्यावरील कॉर्नर, शिवनारंडा जवळील कॉर्नर, दालमिया चौपाटी येथे सदर गतिरोधक तयार करण्यात आले आहेत. त्याचा योग्य फायदा होण्यासाठी सदोष करण्याची गरज आहे. या दृष्टीने बांधकाम विभाग अभियंत्याने विशेष लक्ष द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
तेथे दिशादर्शक फलक कधी लागणारवनसडी ते पवनीदरम्यान अनेक ठिकाणी भव्य दिशादर्शक, किलोमीटर अंतर फलक, अन्य दिशादर्शक फलक लावण्यात आले. परंतु सांगोडा येथील चौपाटीवरील दिशादर्शक फलकामध्ये गावाच्या नावात इंग्रजीत बरोबर असला तरी मराठी अक्षरात बदल झाला आहे. त्यामुळे या ठिकाणी नसलेली गावे कुठून आली असा प्रश्न वाहतूकदारांना पडतो. शिवाय होमिओपॅथी दवाखाना कॉर्नर जवळील भव्य फलक मुख्य रस्त्यापासून खूप लांब लावण्यात आले आहे. त्यामुळे गावाच्या दिशादर्शनाचे योग्य मार्गदर्शन मिळत नाही. त्यामुळे भोयगाव गडचांदूर मार्गावरच एक गावाचे दिशादर्शक फलक लावण्यात यावे. तसेच अशाच प्रकारे इरई फाटा, गाडेगाव येथील खैरगाव आवरपूर जोडरस्ता, गाडेगाव फाटा, शिवनारंडा येथे दिशादर्शक व गाव नावफलक लावणे आवश्यक आहे.