राजुरा (चंद्रपूर ) : राजुरा-गडचांदूर मार्गावरील कापनगावजवळ आज (२८ ऑगस्ट) दुपारी चार वाजता भीषण अपघात झाला. विरुद्ध दिशेने येणाऱ्या हायवा ट्रकने ॲटोला जबर धडक दिल्याने सहा जणांचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश असून या दुर्घटनेमुळे पाचगाव गावावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजुरा येथून पाचगावकडे जाणाऱ्या ॲटोला कापनगावजवळ हा अपघात झाला. महामार्गाचे काम सुरू असल्याने वाहतुकीत अचानक बदल करण्यात आला होता. मात्र कोणताही फलक लावला नसल्याने ॲटोचालक संभ्रमात पडला आणि ॲटो हायवेवर गेल्यानंतर समोरून येणाऱ्या हायवाने ॲटोला चिरडले. धडकेनंतर ॲटोचा चक्काचूर झाला.
या दुर्घटनेत रवींद्र हरी बोबडे (४८, पाचगाव), शंकर कारू पिपरे (५०, कोची), वर्षा बंडू मांदळे (४१, खामोना), तनु सुभाष पिंपळकर (१८, पाचगाव), ताराबाई नानाजी पापुलवार (६०, पाचगाव) आणि ऑटोचालक प्रकाश मेश्राम (५०, पाचगाव) या सहा जणांचा मृत्यू झाला.
जखमींमध्ये निर्मला रावजी झाडे (५०, पाचगाव) यांना चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले असून भोजराज महादेव कोडापे (४०, भुरकुंडा) यांच्यावर राजुरा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच राजुरा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सर्व जखमींना उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान, अपघातानंतर ट्रकचालक फरार झाला असून पोलिसांनी ट्रक जप्त करून चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. ठाणेदार सुमित परतेकी पुढील तपास करीत आहेत.