विसापूर : विसापूर ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक रंगतदार ठरण्याची चिन्हे आहेत. ८ हजार २०६ मतदार आहे. यामध्ये ४ हजार २०४ पुरुष व ४ हजार २ महिला मतदारांचा समावेश आहे. पाच प्रभागांमध्ये बहुरंगी लढतीचे चित्र आहे. प्रभाग क्रमांक सहामध्ये तिसरा उमेदवार नसल्याने संत रविदास जयंती कृती समितीचे सचिव संदीप काकडे व विलीन मेश्राम (चुनाभट्टी) यांच्यात सरळ लढत आहे.
काँग्रेससमर्थित ग्रामविकास आघाडीचे नेतृत्व माजी सरपंच बंडू गिरडकर, भाजपसमर्थित शेतकरी ग्रामविकास आघाडीचे नेतृत्व बल्लारपूर भाजप तालुका अध्यक्ष किशोर पंदीलवार, वंचित बहुजन आघाडी समर्थित वंचित परिवर्तन ग्रामविकास आघाडीचे नेतृत्व माजी पं.स. उपसभापती अंकेश्वर मेश्राम व शिवसेना समर्थित सेवाभावी ग्रामीण विकास आघाडीचे नेतृत्व माजी सरपंच भारत जीवने व शिवसेनेचे प्रदीप गेडाम, तर अपक्ष उमेदवारांच्या ग्रामविकास कृती समिती आघाडीचे नेतृत्व राजू लांडगे करीत आहेत. या पाच आघाड्यांसह व काही अपक्षांना घेऊन उभे नरेंद्र ईटनकर मैदानात आहेत. या माध्यमातून सहाही प्रभागांत एकूण ९४ उमेदवार आपले राजकीय भवितव्य आजमावत आहे. मुरब्बी राजकारणी म्हणून ओळखले जाणारे, माजी जि.प. सदस्य रामभाऊ टोंगे हे यावेळी वंचित परिवर्तन ग्राम विकास आघाडीच्या पाठीशी आहे. प्रत्येक आघाडी प्रमुख आपलीच आघाडी बाजी मारतील, असे दावे करीत आहे. सारेच दिग्गज असल्यामुळे सर्वांची प्रतिष्ठापणाला लागली आहे. यात कोण वरचढ ठरतो, हे निवडणूक निकालाअंतीच कळेल.
सहा जागांसाठी तब्बल ४५ उमेदवार
प्रभाग क्रमांक चार व पाचमधील ६ जागांसाठी तब्बल ४५ उमेदवार निवडणूक रिंगणात आहे. सरपंचपदाचे आरक्षण अद्याप जाहीर नसले, तरी या दोन प्रभागांतून विजयी होणारा उमेदवारच सरपंचदावर आरूढ होईल, असे गृहीत उमेदवार प्रचारात गुंतले आहेत. विजयाचे गणित जुळविण्यासाठी काही उमेदवार साम-दाम-दंड-भेद या मार्गाचा वापर करण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.