जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वीस कलमी सभागृहात कोरोना टास्क समितीची बैठक झाली. यावेळी जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, मनपा आयुक्त राजेश मोहिते, अप्पर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, सहायक जिल्हाधिकारी रोहन घुगे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अरूण हुमणे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, आरटीपीसीआरचे प्रभारी डॉ. राजेंद्र सुरपाम, जिल्हा लसीकरण अधिकारी संदीप गेडाम, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त अमोल यावलीकर आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी अजय गुल्हाने म्हणाले, जिल्ह्यात सध्या ६९ केंद्रांवर कोरोना लसीकरण सुरू आहे. आतापर्यंत ६४ हजार ३६० डोज देण्यात आले. यात २० मार्चपर्यंत २४ हजार डोज साठा नव्याने प्राप्त होणार आहे. त्यानंतर २३ नवीन लसीकरण केंद्र सुरू करण्याची तयारी ठेवावी दररोजच्या कोरोना लसीकरणाचे उद्दिष्ट दीड हजारपर्यंत वाढविण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. यावेळी सहाय्य आरोग्य अधिकारी डॉ. सुधीर मेश्राम, मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ. वनिता गर्गेलवार व अन्य अधिकारी उपस्थित होते.
यापुढे रात्री ८ वाजतापर्यंत लसीकरण
उन्हाचे दिवस असल्याने नागरिकांच्या सोयीसाठी सकाळी ८ ते रात्री ८ वाजतापर्यंत लसीकरण केंद्र सुरू ठेवण्यात येणार आहे. कोरोना तपासणीसाठी सर्व आरटीपीसीआर केंद्र लवकर बंद न करता सायंकाळी ५ वाजतापर्यंत सुरू राहणार आहे.
३५० बेड्स सज्ज ठेवणार
३५० बेड्सचे शासकीय महिला रूग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू करावे, लिक्वीड ऑक्सिजन व औषधांचा पुरेसा साठा ठेवण्याची खबरदारी घेण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. खासगी हॉस्पिटल व हॉटेलमध्ये कोरोना रूग्णांना बेड उपलब्ध होऊ शकतील का याबाबतही आढावा घेण्यात आला.