सिंदेवाही : शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील दुभाजक दोन ठिकाणी तुटले होते. नागरिक शॉर्टकट रस्ता मार्गाचा वापर करतात. यामुळे अपघाताची शक्यता असते. याबाबत लोकमतने वृत्त प्रकाशित केल्यानंतर तुटलेल्या दुभाजकाच्या दुरुस्ती कामाची सुरुवात करण्यात आली आहे.
शहरातील नागपूर ते चंद्रपूर मुख्य महामार्गावर मोठ्या प्रमाणात रहदारी असते. याच मार्गावर श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बँक ऑफ महाराष्ट्रपर्यंत असलेल्या दुभाजक सूरज हार्डवेअरजवळ दोन ठिकाणी तुटलेले होते. वर्दळीचा वाहतुकीचा रस्ता आहे. हे दुभाजक पावसाळ्यातील पाणी रस्त्यावर साचत असल्यामुळे पाण्याची विल्हेवाट लावण्याकरिता काही वर्षांपूर्वी तोडण्यात आले. परंतु तुटलेल्या दुभाजकाचा वापर शहरातील नागरिक शॉर्टकट रस्ता म्हणून करीत होते. अजूनपर्यंत नादुरुस्त असलेले दुभाजक अपघातास आमंत्रण देत असल्याने याबाबत लोकमतने वृत्त प्रकाशित करून लक्ष वेधले. त्यानंतर दुभाजकाच्या दुरुस्ती कामाची सुरुवात करण्यात आलेली आहे.